Sanjay Raut On Buldhana Bus Accident: समृद्धी महामार्गावर खासगी प्रवासी बसला अपघात होऊन बसने पेट घेतल्याने बसमधील २५ जणांचा मृत्यू झाला आहे. हा भीषण अपघात सिंदखेड राजा नजीक पिंपळखुटा फाट्याजवळ पहाटे दीड वाजेच्या सुमारास घडला. यानंतर आता यावरून राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या घटनेवर भाष्य करताना, अनेकांचे शाप आणि अश्रू त्या रस्त्यामध्ये दिसतात, असे म्हटले आहे.
समृद्धी महामार्गावर झालेला अपघात हा गेल्या वर्षभरामध्ये झालेल्या अपघातामधील मोठा अपघात आहे. समृद्धीवरील अपघातांचे प्रमाण वाढले आहे. २५ लोक ज्या पद्धतीने मरण पावले हे दुर्दैवी आहे. समृद्धी महामार्ग हा शापित महामार्ग झाला आहे. तो शापित का झाला त्याच्या खोलात जावे लागेल. ज्या पद्धतीने तो महामार्ग बनवण्यासाठी सरकारने निर्णय केले. त्या अनेक गोष्टी तपासाव्या लागतील. भविष्यात त्या सर्व गोष्टी समोर येतील. दुर्दैवाने त्या रस्त्यावर वारंवार अपघात होत आहेत, लोक मृत्यू होत आहेत हे काही चांगले नाही, किती वेळा श्रद्धांजली वहायच्या, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
अनेकांचे शाप आणि अश्रू त्या रस्त्यामध्ये मला दिसतात
वेग मर्यादेसंदर्भात आम्ही अनेकदा मागणी केली. त्यासंदर्भात काही होत नाही. समृद्धी महामार्ग भ्रष्टाचाराने तयार झाला आहे.अनेकांच्या जमिनी त्यासाठी हडप करण्यात आल्या जबरदस्तीने घेण्यात आल्या. अनेकांचे शाप आणि अश्रू त्या रस्त्यामध्ये मला दिसतात आणि म्हणून तर अपघात होत नाहीत ना, असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, या घटनेबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेयांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच, अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारच्यावतीने पाच लाखांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. दुसरीकडे, या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला असून, बुलढाणा येथील बस दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना PMNRF कडून २ लाखांची मदत दिली जाणार आहे आणि जखमींना ५० हजारांची मदत केली गेली आहे.