Maharashtra Politics: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक सोमवारी रात्री मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. शिवतीर्थावरील या भेटीनंतर राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्याचे सांगितले जात आहे. भाजप आणि मनसेमध्ये जवळीक वाढल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये मुंबई महानगरपालिका तसेच आगामी निवडणुकांसाठी युती होणार असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबाबत संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना खोचक टीका केली आहे.
देवेंद्र फडणवीस सोमवारी रात्री दहाच्या सुमारास राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचले. त्यांची ही भेट तब्बल सव्वा तासांची होती. यावर बोलताना फडणवीस म्हणाले होते की, अराजकीय गप्पा मारण्यासाठी शिवतीर्थवर गेलो होतो. बऱ्याच दिवसांपासून आमचे ठरले होते की एक दिवस गप्पा मारायला बसू आणि काल तो मुहूर्त निघाला. असे ठरले होते की राजकीय सोडून गप्पा करायच्या. गप्पा या अराजकीय असतात, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यावर संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.
आठ दिवस राहिले तरी हरकत नाही
देवेंद्र फडणवीस यांनी शिवतीर्थावर लॉजिंग बोर्डिंग केले तरी आम्हाला काही अडचण नाही. देवेंद्र फडणवीस तिथे गेले आणि आठ दिवस राहिले तरी हरकत नाही. ते तिथे गेले कारण राज ठाकरे हे उत्तम होस्ट आहेत. ते लोकांचे स्वागत फार चांगले करतात. अगदी पहिल्यापासून. देवेंद्र फडणवीसांना शिवतीर्थावर जायची इच्छा झाली असेल तर त्यांनी तिथे जावे, इतरही लोकांनी जावे. शिवतीर्थावर सकाळी वॉकला जावे. तिथे उत्तम पदार्थ मिळतात, चांगले हॉटेल्स आहेत तिथे. मूळात कोण कुणाकडे जाते, याच्यामुळे शिवसेनेचे भविष्य ठरत नाही. शिवसेना ही शिवसेनेच्या जागेवर आहे, या शब्दांत संजय राऊत यांनी खोचक प्रतिक्रिया दिली.
दरम्यान, महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन मोठे राजकीय नेते भेटले आणि राजकारणावर चर्चा झालीच नाही, यावर विश्वास ठेवणे कठीण असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतर वेगवेगळे तर्क-वितर्क लढवले जात असून, नवे कयास बांधले जात आहेत.