Sanjay Raut On Milind Deora Stand: गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम देत मिलिंद देवरा यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. दक्षिण मुंबई मतदारसंघातून उमेदवारी मिळणार नाही हे जवळपास स्पष्ट झाल्याने मिलिंद देवरा यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. राजकीय वर्तुळातून यावरून प्रतिक्रिया उमटत असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावर भाष्य केले आहे. तसेच दक्षिण मुंबईची जागा आमचीच असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.
मीडियाशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, या सर्वाची चिरफाड करणारी एक महापपत्रकार परिषद घेणार आहे. आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाची चिरफाड करणारी महापत्रकार परिषद उद्धव ठाकरे हे जनतेच्या न्यायालयात घेणार आहेत. वरळी येथे १६ जानेवारीला दुपारी ४ वाजता डोम खाली उद्धव ठाकरे महापत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेला अनेक मान्यवर उपस्थित असतील, वकील असतील, कायदेतज्ज्ञ असतील आणि जनतेला या पत्रकार परिषदेचे आमंत्रण देण्यात आले आहे. जनतेच्या न्यायालयामध्ये निकालाची चिरफाड होईल. देशाच्या इतिहासातील अशी पहिली खुली पत्रकार परिषद ही पहिल्यांदाच महाराष्ट्रातील जनतेसमोर उद्धव ठाकरे घेतील, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
दक्षिण मुंबईची जागा आमचीच आहे
मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, जर कुणी निवडणुकांसाठी किंवा पदासाठी पक्ष बदलणार असतील, तर ती महाराष्ट्राची परंपरा सुरु झाली आहे. त्या परंपरेनुसार, ते पक्ष बदलणार असतील, तर त्यावर काँग्रेस पक्षाने भूमिका घ्यावी. मी यावर का बोलू, माझा आणि माझ्या पक्षाचा याच्याशी काहीही संबंध नाही. दक्षिण मुंबईची जागा आमचीच आहे, अरविंद सावंत दोनदा निवडून आले आहेत, असे संजय राऊत यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. तसेच पहिलाच दौरा कल्याणमध्ये केला. उद्धव ठाकरेंनी फक्त शाखांना भेटी दिल्या पण तिथे सभेचे रुप आले. अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, कळवा या ठिकाणी उद्धव ठाकरे यांना जो उदंड प्रतिसाद मिळाला, तो पाहता कल्याण शिवसेनेचे आहे आणि खऱ्या शिवसेनेचाच राहील, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. कल्याणची बांधणी पूर्ण होत आहे, लवकरच तिथला उमेदवार जाहीर होईल, असे संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, एक केंद्रीय मंत्री, नारायण तातू राणे, यांनी शंकराचार्य यांच्याबद्दल एक भूमिका व्यक्त केली. जसे ख्रिश्चन धर्मात पोप असतात, मुस्लिम धर्मात त्यांचे धर्मगुरू असतात तसे शंकराचार्य आमच्यासाठी आहेत. धर्माचे मार्ग दाखवतात, पण हे कोणी जे भाजपाचे मंत्री आहेत त्यांनी जे वक्तव्य केले आहे त्याबद्दल त्यांनी २२ तारखेच्या आधी माफी मागावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.