Maharashtra Politics: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत केलेल्या गौप्यस्फोटानंतर अद्यापही यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. सुरुवातीला या प्रकरणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अधिक भाष्य केले नव्हते. मात्र, आता यासंदर्भात शरद पवारांनी एक विधान केले आहे. यानंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाल्याचे सांगितले जात आहे. ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी यावर भाष्य करताना, शरद पवारांना ओळखायला १०० जन्म घ्यावे लागतील, असे म्हटले आहे.
सरकार स्थापन करताना आम्ही आमदारांचे बहुमत दाखवले असते तरी राजभवनातील राज्यपालांनी बहुमतासाठी आमदारांची डोकी मोजायलाच पाच वर्षे लावली असती. पहाटेच्या शपथविधीमुळे कोंडी फुटली. लख्ख उजाडले. पहाटेच्या शपथविधीमुळे फक्त २४ मिनिटांत राष्ट्रपती राजवट उठवण्यात आली. यामुळे महाविकास आघाडीचा मार्ग मोकळा झाला, असे संजय राऊत म्हणाले.
शरद पवार यांनी जे सांगितले ते सत्य आहे
शरद पवार यांनी जे सांगितलं ते सत्य आहे. शरद पवार यांना ओळखायला १०० जन्म घ्यावे लागतील, असे मी म्हणालो होतो. तेव्हा माझ्यावर टीका झाली होती. तुम्हाला आता काय ते कळलेच असेल. शरद पवार यांना पहाटेच्या शपथविधीविषयी माहिती होते की नाही, याबाबत मला कल्पना नाही. पहाटेच्या शपथविधीची महाविकास आघाडी सरकारची स्थापना होण्यास मदत झाली. अन्यथा आमच्याकडील बहुमत तोडण्यासाठी राष्ट्रपती राजवट कायम ठेवली असती. त्याबद्दल देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे आभार मानतो, असा टोला संजय राऊतांनी लगावला.
दरम्यान, सरकार बनवण्याचा एक प्रयत्न झाला. त्या प्रयत्नाचा फायदा एकच झाला की राष्ट्रपती राजवट होती ती उठली. ती उठल्यानंतर काय घडले ते तुम्हा सर्वांनाच माहिती आहे. राज्यात तेव्हा तसे काही घडले नसते तर राष्ट्रपती राजवट उठली असती का? आणि उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले असते का? असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"