“भाजपा काँग्रेसला घाबरते, PM भाषणात काश्मिरी पंडित, मणिपूरचा उल्लेखही नाही”: संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2024 12:47 PM2024-02-08T12:47:27+5:302024-02-08T12:47:30+5:30
Sanjay Raut News: खोटारडेपणावरच भाजपा टिकून आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली.
Sanjay Raut News: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरील चर्चेचा उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएचा पुढील पाच वर्षांचा रोडमॅप सादर करताना काँग्रेसवर सडकून टीका केली. या टीकेनंतर भाजपा आणि केंद्र सरकारविरोधात विरोधकांनी हल्लाबोल केला असून, भाजपालाकाँग्रेसची भीती वाटते, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
मीडियाशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, भाजपाला काँग्रेसची भीती वाटते. इंडिया आघाडीची भीती आहे. तुम्हाला तुमच्या हिंमतीवर, ताकदीवर ४०० जागा मिळणार आहेत, असे तुम्ही म्हणता ना. मग गेल्या १० वर्षांत तुम्ही वारंवार काँग्रेसवर टीका का करताय? ५०-६० वर्षांचा इतिहास तोडून-मोडून लोकांसमोर का सांगताय? तुम्ही केलेल्या कामांविषयी बोला. पंतप्रधानांच्या भाषणात कुठेही मणिपूरचा उल्लेख आला नाही. काँग्रेसमुळे राष्ट्र कसे दुभंगले, असे सांगता. मणिपूर दुभंगले आहे. तुमच्या मनात मणिपूरबद्दल थोडीही वेदना नसावी? तुम्ही कश्मिरी पंडितांविषयी एक शब्द बोलला नाहीत. ज्या कश्मिरी पंडितांच्या नावावर २०१४ला तुम्ही मते मागितली. त्यांच्या घरवापसीवर आधी तुम्ही बोलत होतात. पण आता त्यांच्यावर तुम्ही बोलला नाहीत. लडाखमध्ये चीन घुसलाय त्यावर तुम्ही बोलला नाहीत. पण फक्त पंडित नेहरू आणि काँग्रेसचे भजन करत बसलात. आता हे रामालाही विसरले आणि पुन्हा काँग्रेसच्या मागे लागलेत, या शब्दांत संजय राऊतांनी निशाणा साधला.
श्वेतपत्रिकेत सिंचन घोटाळ्याची पुरवणी जोडा
केंद्र सरकार २०१४पूर्वीच्या गैरव्यवहारांवर श्वेतपत्रिका काढणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटले होते. यावर, त्यांनी श्वेतपत्रिका काढायलाच पाहिजे. त्याला एक पुरवणी जोडली पाहिजे. त्यात ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांचा २ हजार कोटींचा नळ-पाणी घोटाळा, हसन मुश्रीफ यांचा घोटाळा, प्रफुल्ल पटेल यांचा मिरची घोटाळा, अलिकडचा ८ हजार कोटींचा घोटाळा यांचा समावेश करावा. तरच ती श्वेतपत्रिका पूर्ण होईल. भाजपाने असे अपूर्ण काम करून सरकारमधून बाहेर पडू नये. ज्या भ्रष्टाचाराचा उद्घोष नरेंद्र मोदींनी पंतप्रधान म्हणून केला तो अजित पवारांचा ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा भाजपाला विसरता येणार नाही. कारण तो यूपीएच्या काळातलाच घोटाळा होता, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
दरम्यान, भंडारा मतदारसंघात काँग्रेसने आंबेडकरांचा पराभव केला, असे सांगितले. पण गंमत अशी आहे, की तेव्हा बाबासाहेब आंबेडकर काँग्रेसचे उमेदवार नव्हते. पण त्यांचा पराभव करण्याची जबाबदारी तेव्हा ज्यांच्यावर होती, ते तिकडचे काँग्रेसचे नेते मनोहर पटेल यांचे चिरंजीव प्रफुल्ल पटेल हे आज भाजपामध्ये आहेत. मनोहर पटेल तेव्हा भंडाऱ्याच्या निवडणुकीचे प्रमुख होते. तेव्हा काँग्रेसच्या विजयाची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्या प्रफुल्ल पटेलांना तुम्ही वाजत-गाजत पक्षात घेतले. त्यामुळे हा ढोंगीपणा भाजपाच्या धमन्यांतून कधी बाहेर पडेल सांगता येत नाही. खोटारडेपणावरच हा पक्ष टिकून आहे. पंडित नेहरूंच्या संदर्भात त्यांनी केलेली वक्तव्य हे नेहरूंचे यश आहे. गेल्या १० वर्षांत मोदी त्यांच्या नावाचा जप करतायत. जेव्हा मोदी पदावरून दूर होतील, तेव्हा त्यांचे स्मरण कुणाला राहणार नाही, असा दावा संजय राऊतांनी केला.