Sanjay Raut: २०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदावरून घेतलेल्या ताठर भूमिकेनंतर राज्यात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. त्यावेळी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी अचानक घडवून आणलेल्या शपथविधीमुळे खळबळ उडाली होती. मात्र फडणवीस आणि अजित पवार यांनी स्थापन केलेले सरकार अवघ्या काही तासांतच कोसळले होते. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एक गौप्यस्फोट केला असून, याला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीक केली.
शरद पवार यांची मिस्ट्री समजून घ्यायची असले तर त्यांच्या हिस्ट्रीमध्ये जावे लागेल. तेव्हाच तुम्ही ही मिस्ट्री समजू शकता. मी अगदी स्पष्टपणे सांगतो की, ज्यावेळी उद्धव ठाकरे यांनी आमच्याशी असलेले नाते तोडून मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत बोलणी सुरू केली. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस तुमच्यासोबत येऊ शकते. आम्ही राज्याला स्थिर सरकार देऊ इच्छितो, असे सांगितले. त्यानंतर आमची शरद पवारांबरोबर बैठक पार पडली. त्या बैठकीत ठरले की, महाराष्ट्रात भाजप-एनसीपीचे सरकार स्थापन केले जाईल. सरकार कसे असेल, याचा आराखडा तयार झाला. अजित पवार आणि मी या सरकारचे नेतृत्व करणार, हेही ठरले. सर्व अधिकार आम्हाला दिले. त्याप्रमाणे आम्ही सगळी तयारी केली. पण शेवटच्या क्षणी शरद पवारांनी त्यातून माघार घेतली, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला.
पवारांनी काय केले? तो प्रयोग तुमच्या अंगाशी आला, पूर्ण फसला
देवेंद्र फडणवीसांकडे कोणताही नवीन मुद्दा नाही. त्यांचे हे सरकार औटघटकेचे आहे. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेण्याची दिलेली मुदत निम्मी संपली आहे. त्यामुळे १०० टक्के त्यांचे सरकार पडते. कदाचित ते झोपेत किंवा जागेपणी बडबडत असतील. त्यांच्याकडे फार लक्ष देऊ नका. शरद पवारांनी अमुक केले वगैरे ते बोलतायत. ठीक आहे ना. त्यात नवीन काय आहे? काय केले शरद पवारांनी? आमच्याशी बोलत होते वगैरे सांगताय. तुम्ही एक प्रयोग केला आणि तो फसला ही एका ओळीची गोष्ट आहे. तो प्रयोग तुमच्या अंगाशी आला. लोकांनी तुमच्याकडे गांभीर्याने पाहिले नाही, या शब्दांत संजय राऊत यांनी खरपूस समाचार घेतला.
दरम्यान, डबल गेमची गोष्ट सोडा. सरकार बनले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. शरद पवारांनी त्या सरकारला पूर्णपणे समर्थन दिले हे सत्य आहे. आता तुम्ही सकाळी कोणती शपथ घ्यायला सांगितली वगैरे तो तुमचा प्रश्न आहे. तुमचा प्रयोग पूर्णपणे फसला, असे संजय राऊत म्हणाले.