Sanjay Raut Replied Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे चिंतन शिबिर झाले. यामधून पक्षाचे नेते छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल यांच्यासह अजित पवार यांनी सत्तेत सहभागी होणे, शरद पवार यांचा राजीनामा यांसह अनेक मुद्द्यांवर मोठे गौप्यस्फोट केले. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत कोणत्या जागांवर लढणार याबाबतही सूतोवाच केले. यानंतर आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.
भाजपने पक्ष आणि घर फोडली आहेत. आता नेते तुटत नाहीत. म्हणून चारित्र्यावर हल्ला केला जात आहे. अजित पवार आणि शिंदे गटाने त्यांचा मार्ग निवडला. सध्या अजितदादा नाही बोलत नाहीत. तर भाजप बोलत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी काम करणारे पक्ष आहेत. या पक्षांना भाजप संपवू पाहात आहे. पण तसे होणार नाही. राज्यातील जनता आमच्यासोबत आहे. भविष्यात महाराष्ट्रात आणि देशात आमचे सरकार येईल, असा दावा संजय राऊतांनी केला.
संघाचे हे कारस्थान आणि कपट आहे
अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या जागा लढवण्याबाबत स्पष्ट संकेत दिले. यावर बोलताना, ती अजित पवार यांची भूमिका आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना संपवण्याण्यासाठी भाजपकडून षड्यंत्र रचले जात आहे. संघाचे हे कारस्थान आणि कपट आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली. तसेच राजकारण आम्हाला पण कळते. शरद पवार गेले का कुठे? शरद पवार पुरोगामी महाराष्ट्राचे नेते आहेत. शिंदे आणि अजित पवार यांचे आरोप ही भाजप स्क्रिप्ट आहे, असा आरोप संजय राऊतांनी केला.
दरम्यान, सरकार कुणालाही अटक करेल. कायद्याने अडवता येत नाही, म्हणून व्यक्तिगत हल्ले केले जातात. त्यांच्या समाजासाठी ते काम करत आहे. मनोज जरांगे सरकारला धोकादायक वाटतात. जे लोक यांना कायद्याने आवरता येत नाहीत. त्यांना हे अटक करण्याचे अस्त्र उगरतात, या शब्दांत संजय राऊतांनी निशाणा साधला.