Sanjay Raut on Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाखो मराठा बांधवांनी नवी मुंबई येथे शक्तिप्रदर्शन केले. यानंतर मनोज जरांगे यांच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आणि विजय गुलाल उधळत मराठा बांधव परतले. यानंतर आता ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षणप्रश्नी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या एका मुद्द्याला ठाकरे गटाने पाठिंबा दिला आहे. याबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.
मनोज जरांगे पाटील यांचे अभिनंदन. सरकारने तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या! आता फक्त आरक्षण मिळायचे बाकी आहे. ते कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा , म्हणजे आपल्या मराठा बांधवांना , भगिनींना ही खरी परिस्थिती समजेल! लोकसभा निवडणूकी आधी पारदर्शकता येईल ही अपेक्षा!, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली होती. यावर संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना भाष्य केले.
राज ठाकरेंचा प्रश्न योग्य आहे, मुख्यमंत्री फसवणूक करत आहेत
सरकारने अध्यादेश काढला पण खरच आरक्षण मिळाले आहे का अशी अनेकांना शंका आहे. राज ठाकरेंचा प्रश्न योग्य आहे. मुख्यमंत्री फसवणूक करत आहेत. मनोज जरांगे पाटील साधा माणूस आहे. मंत्रिमंडळात मतभेद स्पष्ट दिसतात. छगन भुजबळ वेगळी तर देवेंद्र फडणवीस वेगळी भूमिका घेतात. मुख्यमंत्र्याची भूमिका ही सरकारची असायला हवी. मुख्यमंत्री शुद्ध फसवणूक करतात. हे सगळे ठरवून चालले आहे, या शब्दांत संजय राऊत यांनी निशाणा साधला.
दरम्यान, जाणीवपूर्वक वाद निर्माण केला जात आहे. तुम्ही मराठ्यांच्या बाजूने बोलायचे आम्ही ओबीसींच्या बाजूने बोलणार. मुख्यमंत्र्यांची भूमिका ही सरकारची असते मंत्री विरोधात भूमिका घेत असेल तर सरकार बरखास्तीची शिफारस हवी. तसे होत नाही म्हणजे त्यांची मिलीभगत आहे. हे केंद्राच्या हातातील अधिकार आहे, असा दावा संजय राऊतांनी केला.