मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कुणी मुख्यमंत्री मानायलाच तयार नाही. महाराष्ट्र नेहमी औद्योगिकदृष्ट्या प्रगतशील राज्यांमध्ये गणलं गेले. पण गेल्या ६-७ महिन्यापासून महाराष्ट्र देशाच्या खिजगणतीत अजिबात नाही. महाराष्ट्राचा विकास आणि प्रगती ज्यांना आवडत नव्हती त्यांनी उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडलं. आत्ताचे मुख्यमंत्री हे दिल्लीची हस्तक असलेली व्यक्ती आहेत अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर घणाघात केला आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र देशात पहिल्या ५ मध्ये होते. त्यानंतर ४ मध्ये आले. त्यानंतर हळूहळू महाराष्ट्र आणि राज्याचे मुख्यमंत्री पहिल्या क्रमांकावर जाण्याची गती प्राप्त करत असताना हे सरकार पाडण्यात आले. कुठेतरी महाराष्ट्राचे पंख कापले जावेत. महाराष्ट्राची प्रगती, विकास काहींना पाहवत नव्हता त्यासाठी हे सरकार पाडून फक्त दिल्लीची हस्तक असलेली व्यक्ती या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर बसवल्याने या महाराष्ट्राची अधोगती सुरू आहे अशी टीका त्यांनी केली.
त्याचसोबत देवेंद्र फडणवीस, शिंदे गटाचे प्रमुख नेते आणि मंत्री असतील, नारायण राणे यांच्यासारखे केंद्रीय मंत्री असतील ते निवडणूक आयोग जी स्वायत्त संस्था आहे आणि सुप्रीम कोर्ट या दोन्हींचे निकाल फुटलेल्या शिंदे गटाच्या बाजूनेच येतील. तुम्ही आनंदोत्सव साजरा करण्याच्या तयारीला लागा अशी भाषा करत असतील तर याचा अर्थ सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाला भाजपानं विकत घेतलंय का? असा प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केला.
दरम्यान, ज्या गोल्डन गँगचं काम महाराष्ट्रात सुरू आहे त्याला सोनेरी टोळी म्हटलं पाहिजे. मंत्रालयात, मंत्र्यांच्या बंगल्यात आणि बाहेर काही ठिकाणी अनेक गोष्टी सुरू आहेत. गोल्डन गँग हाच विषय पत्रकार समोर आणतायेत. या गोल्डन गँगचा पत्रकारांनी शोध घ्यावा असं आवाहन करत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे भाजपावर निशाणा साधला आहे. आजच्या सामना अग्रलेखात ठाकरे गटाने मोदी सरकारवर हल्लाबोल केला होता. गोल्डन गँगचे सदस्य भगतसिंह कोश्यारीही हेदेखील आहेत असंही अग्रलेखातून म्हटलं आहे.