मुंबई - ईडीने मुंबईत अनेक ठिकाणी धाडी टाकल्यात, त्यात शिवसेनेच्या अनेक नेत्यांच्या घरी धाड टाकलीय, कोविड घोटाळ्याच्या नावाखाली टार्गेट केले जातेय. जे शिंदे गटात गेलेत ते मुख्य लाभार्थी आहेत त्यांना का वगळले? खरोखरच चौकशी करायची असेल तर सगळ्यांची करा, दुसऱ्या गटात जाऊन कातडी वाचवतायेत त्या सगळ्यांची चौकशी करा. शिवसेनेच्या प्रमुख लोकांवर कारवाई करायची. ही राजकीय सूडाची कारवाई आहे. आम्ही या कारवाईला हिंमतीने सामोरे जायला तयार आहोत. अनिल परब, रवींद्र वायकर, मी स्वत: आम्ही सामोरे गेलोत, भविष्यात सत्ता बदलली तर फासे उलटे पडू शकतात असा इशारा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा-शिवसेनेला दिला.
संजय राऊत म्हणाले की, दादा भूसे यांचे १७८ कोटी मनी लॉन्ड्रिंग आहे, शेतकऱ्यांच्या पैशांचा अपहार केला, त्याची रितसर तक्रार मी ईडीकडे दिली आहे. राहुल कुल यांचे ५०० कोटींची मनी लॉन्ड्रिंग याबाबतही तक्रार केली आहे पण या लोकांवर कारवाई झाली नाही. राधाकृष्ण विखे पाटील, अब्दुल सत्तार यांच्याबाबतही लवकर तक्रारी करणार आहे. झाकीर नाईक यांच्याकडून विखे पाटलांच्या संस्थेला पैसे कसे आले याचीही चौकशी व्हावी. कितीही संकटे आली तरी शिवसेना झेप घेतेय हे रोखण्यासाठी हे सर्व सुरू आहे. तुम्ही आमचे बळी घ्या, बंदुका चालवा, गोळ्या घाला पण ही घोडदौड सुरू राहील असंही त्यांनी सांगितले.
तर सूरज चव्हाण हे कुठल्याही प्रशासकीय यंत्रणेत थेट सहभाग नाही. जे होते ते सत्ताधारी पक्षात गेले आहेत. ईडीची कारवाई पारदर्शक असली पाहिजे. पण राजकीय हेतू ठेवून प्रतिमा मलिन करण्याचा डाव आहे. कोविड काळातील भ्रष्टाचाराबाबत मुंबईत जशी चौकशी सुरू झालीय, तशी ठाणे, नवी मुंबई, पुणे, नागपूर, पिंपरी चिंचवड येथेही धाडी टाकावी. सर्वांची चौकशी व्हायला हवी असं शिवसेना आमदार सचिन अहिर यांनी म्हटलं. तसेच वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न आहे. ईडीची धाड आहे. निष्पक्ष चौकशी करायला हवी अशी मागणी त्यांनी केली.
काय आहे प्रकरण?आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय असणारे शिवसेना ठाकरे गटाचे सचिव सूरज चव्हाण यांच्या घरी आज ईडीने धाड टाकली. कोविड काळात झालेल्या घोटाळ्यावरून ही धाड टाकण्यात आल्या. त्यानंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सूरज चव्हाण यांच्या घराबाहेर जमले. संतप्त कार्यकर्त्यांनी सत्ताधारी भाजपा-शिवसेनेविरोधात घोषणाबाजी केली.