गेल्या काही दिवसांपासून राज्यात शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांच्या कथित व्हायरल व्हिडीओवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. यानंतर या प्रकरणी काही जणांवर कारवाईदेखील करण्यात आली. विरोधकांनीही या प्रकरणावरून टीका केली आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आल्या रोखठोक या सदरातून सरकारवर टीकेचा बाण सोडला आहे. यात त्यांनी त्या कथित व्हिडीओचादेखील उल्लेख केलाय.
'महाराष्ट्राचे सरकारही मोदींप्रमाणे बेकायदेशीर पद्धतीनेच राजशकट चालवीत आहेत. शिवसेनेच्या शाखांत पोलीस घुसवून शिंदे गटाचे लोक ताबा मिळवत आहेत. पैसा व पोलिसी बळाचा वापर करून कार्यालयांवर ताबा मिळवाल, पण जनभावना कशी विकत घेणार, हा प्रश्न आहे. महाराष्ट्रात एका जाहीर चुंबनाचे प्रकरण सध्या सगळ्यांचेच मनोरंजन करीत आहे,' असे राऊत यांनी आपल्या सदरातून म्हटले आहे.
…त्यांनी सरळ लव्ह जिहादचाच प्रकार केला'शिंदे गटाच्या एका आमदाराने त्यांच्याच महिला पदाधिकाऱ्याचे जाहीर चुंबन घेतले. त्या नाजूक चुंबनाचे राजकीय पडसाद उमटत आहेत. हे चुंबनाचे जिवंत दृश्य समाजमाध्यमांतून लगेच जगभर पोहोचले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत हे चुंबन प्रकरण घडले. आता या चुंबन प्रकरणात शिवसेनेच्या तरुण कार्यकर्त्यांच्या घरांवर धाडी घालून अटका झाल्या. सध्याच्या युगात प्रत्येक गोष्ट समाज माध्यमातून क्षणात पसरते व त्याचा दोष तुम्ही कुणाला देणार? मुळात चुंबन घेणे हा गुन्हा आहे काय यावर निर्णय व्हायला हवा. चुंबन हा गुन्हा नसेल तर मग शिवसैनिकांना अटक करण्याचे कारण काय? संबंधित आमदार व महिला कार्यकर्त्यास चुंबन प्रकरणाचा मनस्ताप झाला हे मान्य केले तरी, सार्वजनिक ठिकाणी घेतलेले साधे चुंबन हे अश्लील कृत्यात मोडते काय याचा खुलासा व्हावा व अटक केलेल्या शिवसैनिकांची सुटका व्हावी. महाराष्ट्रातील सरकारला चुंबनाचे वावडे कधीपासून झाले? एकनाथ शिंदे व त्यांच्या लोकांनी फडणवीस यांच्याबरोबर सरळ ‘लव्ह जिहाद’चाच प्रकार केला व उघडपणे अनैतिक पद्धतीने एकत्र राहत आहेत, यास काय म्हणावे,' असा सवाल त्यांनी केलाय.
भीतीच्या माध्यमातून शोषण'देशात भीतीचे वातावरण आहे. माणसाचे शोषण हे भीतीच्या माध्यमातून केले जाते. आज गुडघे टेकण्याची स्पर्धा त्याच भयातून सुरू आहे. भारतीय जनता पक्षात सामील व्हा, गप्प बसा, नाहीतर तुरुंगात जा, असे सध्या सुरू आहे. एकनाथ शिंदे व त्यांच्या चाळीस लोकांवर अशीच भीतीची तलवार टेकवली व त्यांना शरण आणले हे आता लपून राहिलेले नाही. मोदी-शहांचे राजकीय यश हे त्यांनी निर्माण केलेल्या भीतीत आहे,' असे राऊत यांनी नमूद केलेय.
नाटू नाटूचाच प्रकार'महाराष्ट्रात ‘चुंबना’वर चर्चा सुरू आहे. शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. देशात ईडी, सीबीआयने भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. गौतम अदानीच्या विरोधात वातावरण तापले आहे. त्यावर पाणी टाकण्यासाठी विरोधकांच्या घरांवर धाडी व अटका सुरू आहेत. सगळाच ‘नाटू नाटू’चा प्रकार,' असल्याचे त्यांनी म्हटलेय.