Maharashtra Politics: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सातत्याने भाजपसह केंद्रातील मोदी सरकारवर टीका करताना दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील सुमारे ७१ हजार तरुणांना नियुक्ती पत्रे देणार असून, रोजगार मेळावा अंतर्गत सरकारी विभागात नोकरी मिळालेल्या तरुणांना ही नियुक्ती पत्रे देण्यात येत आहेत. यावरून संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली आहे.
मीडियाशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान आता नियुक्तीपत्र वाटून राजकारण करत आहेत. अशाप्रकारे नियुक्तीपत्र वाटण्याचे काम आमच्याकडे नगरसेवक आणि शाखाप्रमुख करतात, असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे. तसेच महाराष्ट्रात नगरसेवक आणि शाखाप्रमुखांच्या स्थरावर रोजगार मेळावे आयोजित केले जातात आणि त्यांना नियुक्तीपत्र वाटण्याचं कामही नगरसेवक आणि शाखाप्रमुखद्वारे केले होते. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापनाच भू्मीपुत्रांना रोजगार देण्यासाठी केली होती. मात्र, त्यांनी अशी पत्रके कधी वाटली नाहीत, त्यांनी ८० टक्के स्थानिकांना रोजगार मिळावा, यासाठी कायदा केला, असे संजय राऊत म्हणाले.
संविधान आपल्याकडून हिसकवण्याचे काम सत्ताधारी करत आहेत
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्यांनी संविधानाच्या माध्यमातून देशातील गोरगरिबांना त्यांचे हक्क मिळवून दिले. मात्र, तेच संविधान वाचण्यासाठी लढा द्यावा लागतोय, हे बाबासाहेबांचे दुर्देव आहे. देशात संविधान बचाव असे नारे ऐकू येतात. लोकशाहीचे दमन होत आहे. नागरी स्वातंत्र चिरडले जात आहे. जे संविधान आपल्याला बाबासाहेबांनी दिले, ते संविधान आपल्याकडून हिसकवण्याचे काम सत्ताधारी करत आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
दरम्यान, ज्याप्रमाणे एकनाथ शिंदे आणि शिंदे गटातील नेत्यांवर आधी ईडीची कारवाई करून अटकेची भीती दाखवली, तशाचप्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवरही ईडी कारवाई होत आहे. तोच प्रयोग राष्ट्रवादीबरोबर सुरू आहे, असा मोठा आरोप संजय राऊत यांनी केला. शरीर वाघाचे आणि काळीज उंदराचे हे शिवसैनिकाचे वर्णन असू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दाढीत शौर्य होते. यांना दाढी असेल तर ते शौर्य यांनी दाखवले पाहिजे. मात्र, ते घाबरून गेले आणि इतरांनाही घाबरवले, असा टोला संजय राऊतांनी लगावला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"