Shiv Sena Thackeray Group News: आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अन्य पक्षांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानेही तयारीला सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे विविध विभागांतील पदाधिकाऱ्यांच्या बैठका मातोश्रीवर घेत आहेत. विरोधकांच्या इंडिया आघाडीसह भाजप तसेच शिंदे गटाला चितपट करण्यासाठी ठाकरे गटाकडून रणनीति आखली जात असल्याचे सांगितले जात आहे. यातच लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांना विजयी करू, असे ठाकरे गटातील आमदाराने म्हटले आहे.
वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सामील होणार की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र, ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची युती आहे. वंचित बहुजन आघाडीमुळे मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला जोरदार फटका बसला होता. लोकसभा निवडणुक जागावाटपाबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांची लवकरच चर्चा होणार आहे. त्यानंतरच कोणती जागा कुणाला याचा निर्णय होणार आहे. मात्र, त्याधीच प्रकाश आंबेडकर यांनी अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केल्याचे म्हटले जात आहे. यासंदर्भात बोलताना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी प्रकाश आंबेडकरांना विजय करू, असे म्हटले आहे.
... तर लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांना विजयी करु
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अकोला लोकसभा आणि जिल्ह्यातील विधानसभा निहाय आढावा घेतला. यावेळी अनेक विषयावर चर्चा झाली. भाजपला पराभूत करायचे असेल तर ही जागा नक्कीच शिवसेनेला मिळावी असे मत आम्ही मांडले. गेल्या अनेक वर्षांपासून अकोल्यात काँग्रेसचा पराभव होत आहे त्यामुळे ही जागा आपल्याकडे असावी. यावेळी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी आपल्यासोबत आहेच. पण, त्यांनी केवळ लोकसभेपुरते राहू नये. विधानसभेला आपल्यासोबत सोबत राहायला हवे. अकोला लोकसभेची जागा शिवसेनेला मिळावी. जर शिवसेनेला ही जागा मिळणार नसेल आणि येथून वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर लढणार असतील तर आम्ही त्यांनादेखील विजयी करू. कोणत्याही परिस्थितीत भाजपला ही जागा जिंकू देणार नाही, असे नितीन देशमुख यांनी स्पष्टपणे सांगितले.
दरम्यान, दुसरीकडे संजय राऊत हे मुंबईतील ईशान्य मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढण्याची दाट शक्यता आहे. ठाकरे गटासह महाविकास आघाडीत जोरदार हालचाली सुरू झाल्या असल्याचे सांगितले जात आहे. संजय राऊत यांनी ईशान्य मुंबईतून निवडणूक लढवल्यास त्यांची ही पहिलीच लोकसभा निवडणूक असेल असे सांगितले जात आहे. संजय राऊत हे राज्यसभेवर चार वेळा निवडून आले आहेत.