Sanjay Raut: मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या हल्ल्यावरून राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याचे दिसत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता होता होता, मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेते आमनेसामने आले आहेत. यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSS आणि हेमंत करकरे यांच्यात संघर्ष सुरू होता. संघाचे लोक माझ्याकडे यायचे, असा दावा केला आहे.
आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांना लागलेली गोळी ही दहशतवाद्याच्या बंदुकीतील नव्हती तर संघाशी समर्थित पोलीस अधिकाऱ्याने झाडली होती. हे सत्य उज्ज्वल निकम यांनी न्यायालयापासून लपवून ठेवले आहे, असा मोठा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. यावरून भाजपासह उज्ज्वल निकम यांनी विजय वडेट्टीवारांना जोरदार प्रत्युत्तर दिले. या वादात संजय राऊतांनी उडी घेत मोठे विधान केले आहे.
विजय वडेट्टीवार यांचे नाव का घेता? करकरे यांच्यावरील पुस्तक वाचा
एटीएसने साध्वी प्रज्ञा आणि कर्नल पुरोहित यांना अटक केली होती. रमेश उपाध्याय यांना अटक केली होती. त्या केसचा अभ्यास केला आहे. त्यावेळी आरएसएसचे लोक माझ्याकडे यायचे, हेमंत करकरेंनी चुकीच्या पद्धतीने कारवाई केल्याचे सांगायचे. कर्नल पुरोहित यांचे कुटुंबीय माझ्याकडे यायचे. पण तुम्ही विजय वडेट्टीवार यांचे नाव का घेता? हू किल्ड करकरे हे पुस्तक वाचा, ते हसन मुश्रीफ यांचे भाऊ एस एम मुश्रीफ यांनी लिहिले आहे. कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा हे आरएसएसचे लाडके होते. त्यांना अटक झाल्याने संघ आणि हेमंत करकरेंमध्ये संघर्ष सुरु होता, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, हेमंत करकरे हे पोलीस अधिकारी देशासाठी लढताना शहीद झाले आहेत. कसाब आणि त्याची टोळी जेव्हा मुंबईत घुसली तेव्हा हेमंत करकरे त्यांचा सामना करत होते. त्यांचा मृत्यू कसाबच्या गोळीने झाला की, आणखी कुठल्या गोळीने झाला हा भाग आमच्यासाठी महत्त्वाचा नाही. करकरे हे देशासाठी शहीद झाले तेव्हा ते एटीएसचे प्रमुख होते. हेमंत करकरेंच्या मृत्यूबाबत काही लोकांनी प्रश्न उपस्थित केले होते. त्यांच्या मृत्यूबाबत शंका उपस्थित केली होती. पण मला विचाराल तर मला असे वाटत नाही. कारण इतर पोलीस अधिकारीही या हल्ल्यात शहीद झाले, असे संजय राऊत यांनी सांगितले.