Sanjay Raut Reaction On Arvind Kejriwal Arrest: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाचा मोठा विस्तार केला. केवळ दिल्ली, पंजाब नाही, तर देशभरात पक्ष मोठा होत आहे. अण्णा हजारे यांच्यासोबत भ्रष्टाचाराविरोधात लढाई केली. याचीच भाजपाला भीती आहे. आम आदमी पक्ष इंडिया आघाडीचा घटक पक्ष आहे. अरविंद केजरीवाल यांची अटक राजकीय सूडबुद्धीने केलेली अटक आहे, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली.
शंभर कोटी रुपयांच्या कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यात ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली. यानंतर आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने करत भाजपा आणि केंद्र सरकावर टीकास्त्र सोडले. इंडिया आघाडीसह विरोधकांनी अरविंद केजरीवाल यांच्यावरील कारवाईचा कडक शब्दांतून निषेध नोंदवला. मीडियाशी बोलताना संजय राऊत यांनी भाजपा आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.
त्यांना निवडणूक हरण्याची, उठाव होण्याची भीती आहे
हा घोटाळा फक्त कागदावरच आहे. तरीही त्यांना अटक करण्यात आली. हुकुमशाहीप्रमाणे अशी कारवाई होत आहे. एकेकाळी नरेंद्र मोदी भ्रष्टाचाराच्या विरोधात लढत होते. अरविंद केजरीवाल यांची अटक बेकायदेशीर आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना ज्यांच्यापासून भीती आहे, त्यांना अटक करण्यात येत आहे. त्यांना निवडणूक हरण्याची, उठाव होण्याची भीती आहे. त्यामुळे सर्व नेते तुरुंगात टाकत आहे, असा आरोप संजय राऊतांनी केला.
दरम्यान, अण्णा हजारे यांना पहिले जागे करा, कुठे आहेत ते? मला माहिती नाही, कुठे असतात ते. एकेकाळी त्यांचे आंदोलन होते एकीकडे अशा विषयांवर. आता कुठे हरवले आहेत ते मला माहिती नाही, असे संजय राऊत म्हणाले.