Maharashtra Politics: आताच्या घडीला संपूर्ण राज्याचे लक्ष पुण्यातील कसबा आणि चिंचवड मतदारसंघातील विधानसभेच्या पोटनिवडणुकीकडे लागले आहे. भाजप ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. भाजपला शिंदे गटाची साथ मिळत असून, खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरोधकांशी संपर्क साधत पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन करत असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधला का, असा प्रश्न ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना करण्यात आला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपर्क साधल्याचे सांगितले जात आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला की, नाही याबाबत संभ्रम होता. त्याबाबत थेट संजय राऊत यांनाच विचारण्यात आले. मीडियाशी बोलताना संजय राऊत यांनी पोटनिवडणुकीवर सविस्तर प्रतिक्रिया दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना फोन केला का?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमच्याकडे संपर्क केला नाही. होण्याची शक्यता नाही. त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून सहकारी पक्षासोबत राहू, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. अंधेरी अपवाद असला तरी तिथे निवडणूक झाली. पंढरपूरला झाली. तिथे अपवाद पाळला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवाहन केले असले तरी आणि राज ठाकरे यांनी पत्र लिहिले असले तरी या दोन्ही निवडणुका होतील. निवडणुका बिनविरोध होणार नाही, असे संजय राऊत म्हणाले. दोन्ही मतदारसंघातील वातावरण सध्याच्या सरकारला अनुकूल नाही. विधानसपरिषदेच्या निवडणुकीतून जनतेच्या मनात काय आहे हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या निवडणुकीत विधान परिषदेच्या निकालाचीच पुनरावृत्ती होईल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, राज्याच्या राजकारणात कटुता वाढली आहे. ती संपली पाहिजे. त्यासाठी ते पुढाकार घेणार होते. त्यांचे पाऊल का पुढे पडले नाही. याबाबत संभ्रम आहे, या शब्दांत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"