Maharashtra Politics: आताच्या घडीला एकीकडे विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आलेले असताना महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी सुरू झाली आहे. ठाकरे गटाच्या युक्तिवादानंतर आता शिंदे गटाच्या बाजूने युक्तिवाद सुरू करण्यात आला आहे. यातच ठाकरे गटातील एका नेत्याने केलेल्या एका विधानावरुन नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते शरद कोळी यांनी केंद्र तसेच राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. आमचा आणि जनतेचा कायद्यावरील विश्वास उडाला आहे. कायदा मोदी-शाह, शिंदे-फडणवीस यांनी विकत घेतला आहे. सत्तेवर बसलेली माणसे विकली गेली आहेत. सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळाला नाही तर प्रसंगी रस्त्यावर उतरावे लागेल. रक्तपात झाला तरी चालेल, असा इशारा शरद कोळी यांनी दिला.
एकनाथ शिंदे यांच्यावर योग्य कारवाई झाली पाहिजे
आमचा विश्वासघात झाला असून धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष आम्हालाच मिळाले पाहिजे सोबतच एकनाथ शिंदे यांच्यावर योग्य कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी शरद कोळी यांनी केली आहे. न्याय आमच्याच बाजूने लागेल, असा विश्वास व्यक्त करत शरद कोळी यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह चाळीस आमदारांवर हल्लाबोल केला आहे.
दरम्यान, शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह देखील आम्हालाच मिळावे, अशी मागणीही शरद कोळी यांनी केली आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावरुन उद्धव ठाकरे यांच्या विविध नेत्यांनी केंद्र सरकारसह निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला होता. त्यामध्ये आता शरद कोळी यांनी थेट सर्वोच्च न्यायालयासह निवडणूक आयोगाववर शंका उपस्थित केली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"