Sushma Andhare Vs DCM Devendra Fadnavis: शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज्यातील गृहमंत्रालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. सुषमा अंधारे यांनी पोलिसांच्या व्हॅनचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. काही तरुण पोलिसांना काही पाकिटे देतात असे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. यावरून सुषमा अंधारे यांनी गृहखात्यावर हल्लाबोल केला आहे.
या व्हिडिओत दिसते, त्याप्रमाणे गाडी येते आणि थांबते. टू व्हिलरवरून दोन लोक येतात, एक मुलगा खाली उतरतो. तिथून एक पोलीस अधिकारी उतरतो, त्या पोलीस अधिकाऱ्याशी तो मुलगा बोलतो. त्यांच्यात काही देवघेव होते. पाकिटे,पिशव्या आत जातात. पाकिटे पिशव्या द्यायच्याच होत्या तर कारागृह प्रशासनाची परवानगी घेऊन द्यायच्या होत्या. इथे द्यायला कोणी परवानगी दिली? इथे का दिली गेली? ही छोटी पाकिटे होती, म्हणजे यात कैद्यांची कपडे तर नव्हते. मग एवढ्या छोट्या पाकिटातून काय दिले, हे कळले पाहिजे. जे कोणी अधिकारी आहेत, त्यांच्या फक्त चौकशा होऊन चालत नाही. कायद्याचे तीन तेरा वाजलेत, असा हल्लाबोल सुषमा अंधारे यांनी केला.
इतक्या संवदेनशील परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे का नाहीत
हा जेल परिसर आहे. इथून २०० मीटर अंतरावर जेल आहे. बाजूला जात पडताळणी केंद्र आहे. पुढे महिला सुधारगृह आहे. इतक्या संवदेनशील परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे का नाहीत. या संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही नाही. मुद्दा हा आहे की तुरुंगातील कैद्यांना भेटायला त्यांचे साथीदार जाणार असतील, वाईट प्रवृत्तीचे लोक येथे वावरणार असतील, या रस्त्यावर अनुचित प्रकार घडला तर सीसीटीव्ही कुठे आहे? अशी विचारणा करत, या प्रकरणातील अधिकाऱ्यांना ओळखा. त्यांना ओळखणे फार अवघड काम नाही. सगळे मीच करायचे असेल तर गृहखाते मलाच द्या. गृहमंत्री म्हणून फडणवीस अपयशी आहेत. तुम्ही फक्त पक्ष फोडत राहा. ओबीसी विरुद्ध मराठा असे वाद लावत जा, अशी टीका सुषमा अंधारेंनी केली.
दरम्यान, ललित पाटील फरार होतो. ललित पाटील म्हणतो, मी पळून गेलो नाही, मला पळून लावले. ज्यांनी पळवले त्यापैकी एकजण सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतो. त्याला सस्पेंड केले जाते. लोकांच्या चौकशा झाल्या पाहिजेत. फक्त चौकशा होऊन चालत नाही. अब्रुनुकसानीचे दावे ठोकणारे सरकारमधील सर्व मंत्री, आता गृह खात्यावर काही बोलणार आहेत का? तुमच्या अब्रुची लक्तरे संपूर्ण महाराष्ट्रात टांगलेली आहेत, या शब्दांत सुषमा अंधारेंनी सुनावले.