Maharashtra Politics: शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी खेडमध्ये घेतलेल्या सभेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्याच ठिकाणी, त्याच मैदानावर सभा घेतली. दोन्ही सभांना किती गर्दी झाली होती, याचे व्हिडिओही सोशल मीडियावर फिरत आहेत. शिवसेना शिंदे गटातील नेत्यांनी उद्धव ठाकरेंसह ठाकरे गटावर जोरदार टीकास्त्र सोडले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली. यानंतर आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार पलटवार करत खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर मोठा आरोप केला आहे.
शिंदे गटाने ठाकरे गटाला या सभेतून जशास तसे उत्तर दिले. मी काम करणारा मुख्यमंत्री आहे घरात बसून फक्त आदेश देणाराच मुख्यमंत्री नाही, असा खोचक टोला लगावत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर विविध मुद्द्यांवरून सडकून टीका केली. मुख्यमंत्र्यांच्या या सभेवर आता सुषमा अंधारेंनी निशाणा साधत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
गर्वाचे घर खाली असते, त्यांना लोकच उत्तर देतील
खेड येथील ही सभा उद्धव ठाकरे यांना उत्तर देणारी असल्याचे मुख्यंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते. यावर बोलताना, त्यांचा हा उन्मत्तपणा, अंहकार सर्वांना माहीत आहे. गर्वाचे घर खाली असते. त्यांना लोकच उत्तर देतील, असा पलटवार सुषमा अंधारे यांनी केला. तसेच मी गद्दार नाही खुद्दार आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते. यावर, गेल्या दहा वर्षातला हा अत्यंत सुंदर आणि दर्जेदार विनोद आहे, असा खोचक टोला सुषमा अंधारे यांनी लगावला.
दरम्यान, उल्हासनगरमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांचे कार्यालय कोणाच्या जागेत आहे? याचा शोध घ्या, किरीट भाऊंनी याचा शोध घ्यावा, असे आव्हान सुषमा अंधारे यांनी दिले. ज्या अनिल जयसिंघानीच्या नावाने अनेक आरोप केले जातात त्यांच्या जागेत श्रीकांत शिंदे यांचे कार्यालय असल्याचा मोठा आरोप त्यांनी यावेळी केला. जयसिंघानी यांची जवळीक कोणाची? याचा तपास झालाच पाहिजे, अशी मागणीही सुषमा अंधारे यांनी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"