Maharashtra Politics: जसे मला समजून घेतले तसे तुम्ही उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना समजून घ्या, असा वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा शेवटचा शब्द एकनाथ शिंदे गट पाळू शकत नाहीत, यावरून हे सत्तातूर झालेत हे दिसून येते. एकनाथ शिंदेंनी धनुष्यबाण देवेंद्र फडणवीस अन् टीम भाजपकडे गहाण ठेवला आहे, अशी घणाघाती टीका शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर मीडियाशी बोलताना सुषमा अंधारे यांनी शिंदे गट आणि भाजपवर सडकून टीका केली.
निवडणूक आयोगाचा निकाल निश्चितपणे महाराष्ट्राला कुणाला पटलेला नाही. तथ्यांच्या आधारावर निवडणूक आयोगाने निर्णय घेणे अपेक्षित होते. तथ्यांच्या आधारावर जेव्हा कागदपत्र सादर करायला सांगितली होती तेव्हा जर शिंदे गटाची एकूण कागदपत्र ४ लाख सादर झाली असतील. तर त्याच वेळेला आम्ही २२ लाख कागदपत्रे सादर केली होती, असे सांगत मूळात एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या साथीदारांनी मेरिट कधी सिद्ध केले, अशी विचारणा सुषमा अंधारे यांनी केली.
एकनाथ शिंदे यांनी ठरवले पाहिजे की, आपण असे वागावे का?
भाजपने निवडणूक आयोगावर कब्जा केला आहे. जर अशा पद्धतीने भाजप निर्णय घेत असेल आणि हा निर्णय घेताना एकनाथ शिंदेचा कळसूत्री बाहुलीसारखी वापर होत असेल तर हे एकनाथ शिंदे यांनी ठरवले पाहिजे की, आपण असे वागावे का? एकनाथ शिंदे आता मुख्यमंत्री असूनही देवेंद्र फडणवीस यांना विचारता एकही निर्णय घेऊ शकत नाहीत. अजून त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे मंत्रिमंडळ विस्तार सुद्धा साधा करता आलेला नाही. शिवसेना आणि धनुष्यबाणाची गौरव गरिमा आणि अस्मिता शाबूत ठेवण्यासाठी काम करत असतील तर राज्यपाल कोश्यारींच्या राजीनामाच्या ऐवजी त्यांची हकालपट्टी करण्यासाठी त्यांनी केंद्राकडे मागणी केली असती, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.
शिंदेंनी धनुष्यबाण देवेंद्र फडणवीस अन् टीम भाजपकडे गहाण ठेवला
कर्नाटकला गाव जोडतानाचा जेव्हा निर्णय चालू होता तेव्हा सुद्धा जोपर्यंत केंद्र सरकारचा सिग्नल मिळत नाही तोपर्यंत एकनाथ शिंदे चकार शब्द बोलले नाही. उलट बोम्मईच्या आक्रमकपणाला नंतरच्या काळात देवेंद्र काहीसे सामोरे आले परंतु एकनाथ शिंदेंनी हिंमत दाखवली नाही याचाच अर्थ एकनाथ शिंदेंनी धनुष्यबाण हा देवेंद्र फडणवीस आणि टीम भाजपकडे गहाण ठेवलेला आहे, या शब्दांत सुषमा अंधारे यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला.
दरम्यान, गेल्या अनेक महिन्यांपासून शिवसेना पक्षनाव आणि पक्षचिन्हावरून सुरू असलेल्या संघर्षात केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने निर्णय दिला. यामुळे ठाकरे गटाला प्रचंड मोठा धक्का बसल्याचे सांगितले जात आहे. आगामी कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीपर्यंत ठाकरे गटाला आताचे नाव आणि चिन्ह वापरता येणार आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"