Thackeray Group Vaibhav Naik News: उद्धवसेनेचे माजी आमदार आणि अनेक पदाधिकारी पक्ष सोडून जात असल्याची चर्चा थांबविण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर आले आहेत. आता ते पक्षाच्या आमदार आणि खासदारांशी स्वतंत्र चर्चा करणार असल्याचे वृत्त आहे. उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर नेत्यांशी चर्चा केली. तसेच महत्त्वाच्या नेत्यांना उद्धव ठाकरे यांनी चर्चा करण्यासाठी बोलावले होते. यानंतर आता खासदार, आमदारांसोबत स्वतंत्र बैठक घेण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतला आहे.
मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी, पुणे, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यासह राज्यभरातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत असल्याचे चित्र आहे. अनेक वर्ष पक्षासाठी काम केलेले लोकही उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करत आहेत. अलीकडेच कोकणातील ठाकरे गटाचा मोठा चेहरा असणाऱ्या राजन साळवी यांनी उद्धव ठाकरेंना रामराम करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. तर, दुसरीकडे भास्कर जाधव हेही ठाकरे गटाची साथ सोडू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यासंदर्भात आता ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी प्रतिक्रिया देताना विश्वास व्यक्त केला आहे.
भास्कर जाधव लढवय्ये नेते, उद्धव ठाकरेंना सोडून जाणार नाहीत
माझी एसीबीची चौकशी दोन अडीच वर्षांपासून सुरू आहे. एसीबीची चौकशी ही लढाई माझी एकट्याची आहे आणि मी एकटा लढणार आहे. त्या लढाईसाठी मी पक्ष सोडणार नाही. भास्कर जाधव यांच्यासारखा लढवय्या नेता कोकणात आहे. ते निश्चित नाराज नाहीत. त्यांचे एवढेच म्हणणे आहे की, काम करण्याची संधी मिळाली पाहिजे. भास्कर जाधव कुठल्याही प्रकारे नाराज नाही, ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत काम करत राहतील. माझ्यावरही कोणी दबाव टाकलेला नाही, असे वैभव नाईक यांनी म्हटले आहे.
दरम्यान, कोकणातील कुडाळ मतदारसंघातील उद्धवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. विधानसभेतील पराभवानंतर ते पहिल्यांदाच ठाकरे यांच्या भेटीला आले होते. एसीबीच्या माध्यमातून मला त्रास दिला जात असला तरी उद्धव ठाकरे यांची साथ कधीच सोडणार नाही. जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन नव्याने बांधणी करण्यावर भर देऊ, असे वैभव नाईक यांनी म्हटले आहे.