Shiv Sena Thackeray Group News: आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपाने १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तर, महाराष्ट्रातील उमेदवारांचा यात समावेश करण्यात आलेला नाही. दुसरीकडे महाविकास आघाडीत जागावाटपावरून बैठकांचे सत्र सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ देत, अशी प्रार्थना ठाकरे गटाने भराडी देवीचरणी केली आहे.
राज्यातील तमाम भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडीत भराडी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. भराडी देवीच्या दर्शनाला होणारी राजकारण्यांची गर्दी हेदेखील आंगणेवाडीच्या जत्रेचे एक वैशिष्ट्य मानले जाते. आंगणेवाडीत अनेक नेत्यांनी देवीच्या दर्शनासाठी हजेरी लावली. ठाकरे गटाच्या नेत्यांसह भाजपा नेतेही दर्शनासाठी आले होते, अशी माहिती देण्यात आली आहे.
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ देत
दरवर्षीप्रमाणे आई भराडी देवीची सेवा केली. गेल्या १५ वर्षांत जे जे मागितले, ते भराडी देवीने आम्हाला दिले आहे. तिचा आशिर्वाद आमच्यावर कायम आहे. यापुढेही तो असावा. तसेच सिंधुदुर्गासह महाराष्ट्रातील जनतेला ऐश्वर्य मिळाले. उद्धव ठाकरे हे पुन्हा मुख्यमंत्री होऊ दे, अशी प्रार्थना वैभव नाईक यांनी केली. तर कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने आई भराडी चरणी नारळांच्या तोरणाची माळ अर्पण केली. कोकण रेल्वे मार्गावरील अनेक अडथळे, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग लवकरात लवकर पूर्ण व्हावा, कोकणातील जनतेला सुख समृद्ध मिळावे, अशी देवीचरणी प्रार्थना करण्यात आली.
दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आंगणेवाडीत भराडी देवीचे दर्शन घेतले. यावेळी निलेश राणे उपस्थित होते. आई भराडी देवीचे दर्शन घेऊन चांगले वाटले. राज्यात शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादीचे सरकार राहावे. तसेच देशात मोदी सरकारने हॅटट्रिक करावी, अशी प्रार्थना केल्याचे नारायण राणे यांनी सांगितले.