Thackeray Group Vasant More News: दिल्लीत झालेल्या ९८ व्या साहित्य संमेलनातील एका मुलाखतीत बोलताना शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या एका विधानावरून महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहे. ठाकरे गटाकडून सातत्याने नीलम गोऱ्हे यांच्यावर टीकास्त्र सोडले जात आहे. शिवसेना शिंदे गटाकडूनही ठाकरे गटाच्या नेत्यांवर पलटवार केला जात आहे. यातच ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर टीका करताना इशारा दिला आहे.
शिंदेसेनेच्या नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोन्हे यांनी दिल्लीतील साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून केलेले विधान मूर्खपणाचे होते, त्यावर अधिक भाष्य करण्याची आवश्यकता नाही, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांनी फटकारले. तसेच कमी कालावधीत चार पक्ष बदललेल्या नीलम गोन्हे यांना आमदारकीच्या चार टर्म कशा मिळाल्या, हे सर्वांनाच माहिती आहे. गोन्हे यांनी प्रकाश आंबेडकरांसोबत काम केले, त्यानंतर त्या राष्ट्रवादीमध्ये आल्या. नंतर त्या ठाकरे यांच्या शिवसेनेत गेल्या. आता त्या शिंदेसेनेत काम करत आहेत. एवढ्या मर्यादित कालावधीत त्यांनी चार पक्ष बदलले. हा अनुभव लक्षात घेता त्यांनी असे भाष्य करायला नको होते, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
नीलम गोऱ्हे या उद्धव ठाकरेंना काय मर्सिडीज देणार?
मिळालेल्या माहितीनुसार, नीलम गोऱ्हे पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विधान परिषदेत 'लक्षवेधी' मांडण्याच्या धमक्या देऊन पैसे उकळत होत्या, असा मोठा आरोप करताना महापालिका अधिकाऱ्यांकडून पैसे उकळणाऱ्या तुम्ही उद्धव ठाकरे यांना मर्सिडीज काय देणार? अशी विचारणा करत वसंत मोरे यांनी केली आहे.
दरम्यान, उद्धवसेनेचे नेते संजय राऊत यांनी नीलम गोऱ्हे यांचा अत्यंत तिखट शब्दांत समाचार घेतला. ज्या सोन्याच्या ताटात खाल्ले, त्यातच घाण करून गेल्या, असे राऊत म्हणाले.