Thackeray Group Vinayak Raut News: महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत राज्य असलेल्या भाजपाचे अधिवेशन शिर्डीत झाले. या अधिवेशनात येऊन देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना केवळ आणि केवळ उद्धव ठाकरे यांच्यावरच बोलावे लागत आहे. हे भाजपाचे दुर्दैव आहे. आम्हाला अभिमान आहे. उद्धव ठाकरेंवर टीका केल्याने ठाकरे गटाचे काही कमी होणार नाही. पण आजही भाजपाला उद्धव ठाकरेंचे महत्त्व लक्षात येत आहे, म्हणून ते सातत्याने उद्धव ठाकरेंवर टीका करत आहेत, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी दिली.
गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाला एकामागून एक धक्के बसत असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यभरातील अनेक ठिकाणचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नगरसेवक उद्धवसेनेला जय महाराष्ट्र करत शिवसेना शिंदे गट, भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी ठाकरे गटाने केली असली, तरी पक्षाला लागत असलेली गळती सुरूच असल्याचे दिसत आहे. संजय राऊतांनी ठाकरे गटाची स्वबळाची भूमिका मांडल्यानंतर महाविकास आघाडीत संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. यातच भाजपाच्या अधिवेशनात उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका करण्यात आली. मीडियाशी बोलताना विनायक राऊत यांनी भाजपाच्या टीकेवर पलटवार केला.
या देशाची लोकशाही एक दिवस त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही
शिवसेनेने व्होट जिहाद केला. पण, भाजपाने नोट जिहाद केला. मतदारांना खरेदी करायचे आणि मते घ्यायची ही भ्रष्ट राजनीती भाजपाने या देशात सुरू केली. या देशाची लोकशाही एक दिवस त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका विनायक राऊत यांनी केली.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या फाइल्स काढायला सुरुवात केली आहे. एसटीचा महाघोटाळा बाहेर काढला. ठाणे खाडीचा रस्ता कोणतीही परवानगी नसताना हजारो कोटींची टेंडर काढली, ती फाइल बाहेर काढली. बाकी अनेक घोटाळे एकनाथ शिंदे यांचे बाहेर येत आहेत.