मुंबई - आमदार अपात्रता सुनावणी महत्त्वाच्या टप्प्यावर आली असून शिंदे गटाच्या आमदारांच्या उलटतपासणीत वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या बैठकीचा हजेरीपट कळीचा मुद्दा ठरला आहे. ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी या हजेरीपटावर शिंदे गटात गेलेल्या २३ आमदारांच्या सह्या असल्याची बाब शुक्रवारच्या सुनावणीत समोर आणली. याबाबत आमदार दिलीप लांडे, योगेश कदम यांना विचारण्यात आले असता या सह्या आधीच घेण्यात आल्याचा दावा लांडे यांनी केला तर कदम यांच्याकडून मात्र ही सही आपली नसल्याचे सांगण्यात आले आहे.
अपात्रतेची मॅरेथॉन सुनावणी सुरू आहे. तब्बल साडेसहा तास चाललेल्या उलटतपासणीत वर्षा निवासस्थानी २१ जून रोजी शिंदे यांना गटनेतेपदावरून हटविण्यासाठी झालेली बैठक आणि सुरत ते गुवाहाटी आमदारांचा प्रवास यावरून लांडे यांना ११६ तर कदम यांना ७७ प्रश्न विचारण्यात आले.
पुन्हा सुरत, गुवाहाटी२२ ते ३० जून दरम्यान महाराष्ट्राबाहेर गेला हाेतात का, असा सवाल देवदत्त कामत यांनी दोघांनाही विचारला. यावर दिलीप लांडे यांनी ही माझ्या खासगी जीवनातील बाब आहे. त्यामुळे महाराष्ट्राबाहेर मी रिक्षा चालवत गेलो किंवा बैलगाडीने गेलो हे सांगू शकत नाही,असे उत्तर दिले. तर योगेश कदम यांनी मात्र आपण सुरतला गेलो तसेच २२ जूनच्या रात्री एकनाथ शिंदे यांना गुवाहाटी येथे भेटल्याचे सांगितले. तिथे भरत गोगावले यांना व्हिप नेमण्यासाठी प्रतिनिधी सभा झाली होती का, या प्रश्नावर मात्र त्यांनी आपल्याला आठवत नसल्याचे उत्तर दिले.याचा अर्थ ही प्रतिनिधी सभा झालीच नसल्याचा दावा देवदत्त कामत यांनी केला असता हे खोटे असल्याचे सांगत गुवाहाटीत ३९ आमदार असल्याचेही कदम यांनी स्पष्ट केले.
सह्या करणारे आमदार शिंदेंकडे; म्हणतात, ती सही आमची नाही
या हजेरीपटावर मंत्री दीपक केसरकर, गुलाबराव पाटील, संजय राठोड, संतोष बांगर, दादा भुसे, दिलीप लांडे, मंगेश कुडाळकर, सदा सरवणकर, योगेश कदम, उदय सामंत, योगेश कदम यांच्यासह आता शिंदे गटात असलेल्या २३ आमदारांच्या सह्या आहेत. गेल्या आठवड्यात झालेल्या सुनावणीदरम्यान शिंदे गटाची बाजू मांडताना विधिज्ञ महेश जेठमलानी यांनी सुनील प्रभू यांना शिंदेंना हटविण्यासाठी ३० जूनपर्यंत प्रतीक्षा का केली? असा सवाल जेठमलानी यांनी केला हाेता.