गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाची उलटतपासणी सुरु आहे. एकनाथ शिंदे वर १६ आमदारांना अपात्र करण्यावरून सुरु असलेल्या या सुनावणीत शिंदे गटाच्या वकिलांनी शिवसेनेचे प्रतोद सुनिल प्रभू यांना प्रश्न विचारून भंडावून सोडले आहे. काही आमदारांच्या बोगस सह्या केल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. तसेच शिंदे गटाचे आमदार महाराष्ट्रात नसताना प्रभूंनी कसे काय पत्र व्यवहार केले, व्हिप बजावले यावरून प्रभूंना प्रश्न विचारण्यात आले आहेत. या उलटतपासणीचा उद्याचा शेवटचा दिवस आहे. यानंतर लगेचच १ डिसेंबरपासून शिंदे गटाची उलटतपासणी सुरु केली जाणार आहे.
एकनाथ शिंदेंना पत्र कसे पाठविले? उलटतपासणीत अडकले, सुनिल प्रभूंनी विधानसभेत साक्षच बदलली
या सुनावणीदरम्यान हिवाळी अधिवेशनही असणार आहे. यामुळे सुनावणी जर लांबली तर आणखी दोन दिवसांची सुनावणी नागपुरातच घेतली जाणार आहे. शिंदे गटाची उलटतपासणी 1, 2,7,8 डिसेंबरला होणार आहे. ठाकरे गटाच्या वकिलांच्या प्रश्नांना आता शिंदे गटाला तयार रहावे लागणार आहे. तर अंतिम सुनावणीसाठी ८ दिवस देण्यात आले आहेत. तर दोन दिवस राखीव ठेवण्याचा विचार सुरु आहे.
11 ते 20 डिसेंबर दरम्यान अंतिम सुनावणी घेण्यात येणार आहे. 11, 12, 13, 14, 15, 18, 19, 20 डिसेंबर अशा या तारखा आहेत. त्यातच विधानसभेचे अधिवेशन असणार आहे. यामुळे आमदार तसेच विधानसभा अध्यक्षांना ओव्हरटाईम करावा लागणार आहे. अधिवेशनाचे कामकाज आणि दुसरीकडे सुनावणी अशी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. सुनावणी लांबलीच तर २१ आणि २२ डिसेंबर असे दोन दिवस नागपुरातच सुनावणी घेतली जाणार आहे.