"बरं झालं दादा, तुम्ही तिकडं गेलात; आता मांडीवरून त्यांच्या मानेवर बसा, नियती.."

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 02:54 PM2023-08-03T14:54:06+5:302023-08-03T15:14:18+5:30

निवडून आलो काय की पडलो काय मला फरक पडत नाही. माझ्या घराण्यात कुणीही राजकारणात नव्हते. तत्वाने जगेन, तत्वाने मरेन असा माणूस मी आहे असं भास्कर जाधव म्हणाले.

Thackeray MLA Bhaskar Jadhav targets Chief Minister Eknath Shinde | "बरं झालं दादा, तुम्ही तिकडं गेलात; आता मांडीवरून त्यांच्या मानेवर बसा, नियती.."

"बरं झालं दादा, तुम्ही तिकडं गेलात; आता मांडीवरून त्यांच्या मानेवर बसा, नियती.."

googlenewsNext

मुंबई  - विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षांच्या आमदारांनी त्यांचे कौतुक केले. यावेळी भाषण करताना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी अजित पवारांचे नाव घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह समर्थक आमदारांवर निशाणा साधला. बरं झालं दादा तुम्ही तिकडं गेला, नियती कुणालाही सोडत नाही असा टोला जाधवांनी लगावला.

भास्कर जाधव म्हणाले की, अजित पवारांविरोधात शिवसेना आमदार बोलत होते. दादा, आम्हाला निधी देत नाहीत असा आरोप करत होते. आमचे हिंदुत्व तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीवर ठेवले अशी भाषणे करत होते. दादा, तुम्ही तिकडे गेलात ते बरे झाले. आता तुम्ही त्यांच्या मांडीवरून मानेवर बसा. त्यासाठी विजय वडेट्टीवार तुम्हाला मदत करतील. मानेवर बसलं पाहिजे. नियती कुणाचाही न्याय केल्याशिवाय त्याला सोडत नाही. कुठे आहे गुलाबराव तुमचे हिंदुत्व, शेवटी अजित पवारांच्या हातात राज्याच्या तिजोरी आहे. त्यामुळे नियतीचा न्याय नियती करत असते असा घणाघात त्यांनी शिवसेना आमदारांवर केला.

तसेच निवडून आलो काय की पडलो काय मला फरक पडत नाही. माझ्या घराण्यात कुणीही राजकारणात नव्हते. तत्वाने जगेन, तत्वाने मरेन असा माणूस मी आहे. फोडाफोडी करा पण सामान्य माणसाचे मन,त्याच्या भावना काय आहेत याचा विचार करा. डोक्याची टोपी १०० रुपयांची आणि पायातील चप्पल ५ ते १० हजारांचे. आम्ही पक्षात असताना डोक्याच्या टोपीलाही किंमत होती. आणि ५ ते १० हजारांना किंमत नाही ही लोकांची भावना आहे असा टोलाही भास्कर जाधवांनी शिवसेना आमदारांना लगावला.

दरम्यान, लोकशाही टिकवायची, सावरायची याचा विचार करून विजय वडेट्टीवारांनी काम करावे. सरकारचे जिथे चांगले आहे तिथे तोंडभरून कौतुक करा. जिथं सरकारचं चुकत असेल तर गपचुप एकमेकांना डोळे मारू नका. इथं ते चालणार नाही. देवेंद्र फडणवीस हळूच तुम्हाला डोळा मारतील. त्यावर तुम्ही वर खाली आवाज करू नका. आम्ही हे सगळे उद्योग बघून मोकळे झालोय. तुमच्या हातून चांगले काम व्हावे. लोकांवर अन्याय झाला त्यांना न्याय मिळो अशा शुभेच्छा भास्कर जाधव यांनी नवनियुक्त विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना दिल्या.

Web Title: Thackeray MLA Bhaskar Jadhav targets Chief Minister Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.