नवी दिल्ली - एकनाथ शिंदे हे बेकायदेशीर मुख्यमंत्री आहेत. कोर्टाने आणि विधानसभा अध्यक्षाने कायद्याने वागायचे मनात आणले तर ते ५ मिनिटेही त्यापदावर राहू शकत नाही. तुम्ही ५ वर्षाचे काय सांगता? जर तुम्ही कायद्याने आणि घटनेने वागणार असाल तर अजित पवारांची आमदारकीही रद्द होईल. २०२४ नंतर अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांनाही राजकीय फार मोठा धक्का बसेल असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले की, विधिमंडळाच्या इतिहासात इतके बेकायदेशीर विधानसभा अध्यक्ष झाले नाहीत. त्यांनी कायद्याच्या गोष्टी करू नये. ते वकील आहेत, त्यांनी कायद्याची भाषा करणे हा देशातील घटनेचा आणि संविधानाचा अपमान आहे आणि हे हास्यास्पद आहे. स्वत: एकनाथ शिंदे तपास यंत्रणांना घाबरून पळून गेले आहेत. माझ्यासमोर हे त्यांनी कबूल केले आहे. उद्धव ठाकरेंसमोर कबूल केले. त्यांच्याभोवती तपास यंत्रणेचा फास आवळला गेला. त्यांच्या जवळचे बिल्डर आणि सहकारी यांना तपास यंत्रणांनी अचानक उचलले होते आणि त्यानंतर पक्ष सोडण्याच्या त्यांच्या हालचालींना वेग आला हे सर्वांना माहिती आहे असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत शिवसेनेचे जे लोक सोडून गेले त्यातील १० जणांविरोधात ईडीने थेट समन्स आणि अटक वाँरंट काढलेले आहे. आता या अटकेचे वॉरंट आणि समन्स गेले कुठे? हसन मुश्रीफ, प्रफुल पटेल यांचे काय झाले? मी अजून नावे घेऊ शकतो, या सर्वांना ईडीचा धाक आणि अटकेची टांगती तलवार होती. त्याचाच वापर करून राष्ट्रवादी-शिवसेना फोडण्यात आली. या देशात एकतर्फी कारवाई सुरू आहे. जे सरकारच्या विरोधात जातील, सरकारविरोधात बोलतील त्यांच्या दारात, घरात ईडी, सीबीआय पोहचते असा आरोप राऊतांनी सरकारवर केला.
दरम्यान, आपचे खासदार संजय सिंह यांच्यावर ज्यारितीने कारवाई केली त्याचा आम्ही निषेध करतो. केजरीवाल यांनी सांगितले की, देशातील प्रमुख विरोधी पक्षनेत्यांच्या घरी ईडी पोहचेल. आणीबाणीत ज्यारितीने नेत्यांना तुरुंगात टाकले होते तसेच निवडणुकीपूर्वी इंडिया आघाडीच्या नेत्यांना तुरुंगात टाकून हे सरकार निवडणुकीला सामोरे जाईल असा दावा संजय राऊतांनी करत केंद्र सरकारवर निशाणा साधला.