मी महाविकास आघाडीचा चौकीदार....; अजित पवारांच्या टीकेवर संजय राऊतांचं प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 07:43 PM2023-04-18T19:43:29+5:302023-04-18T19:47:16+5:30
केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीवर आहेत. आरजेडी, तृणमूल काँग्रेसवरही दबाव आणून पक्ष फोडले जातायेत हे सत्य आहे असं राऊतांनी सांगितले.
मुंबई - अजित पवारांनी माझ्यावर टीका केली की नाही हे माहिती नाही. अजित पवारांच्या बदनामीची मोहिम सुरू झाली त्यावर आम्ही भूमिका मांडली. जेव्हा शिवसेनेत फूट पाडण्याचा प्रयत्न झाला तेव्हा शरद पवारांपासून, अजित पवारांपर्यंत सगळ्यांनी भूमिका घेतली होती. ती भूमिका आम्ही राष्ट्रवादीच्या बाबतीत घेतली त्यात चुकीचे काय अशा शब्दात संजय राऊतांनी अजित पवारांच्या टीकेला उत्तर दिले आहे.
संजय राऊत म्हणाले की, आम्ही महाविकास आघाडीचे चौकीदार आहोत. महाविकास आघाडी टिकावी, राहावी आणि भक्कम व्हावी यासाठी आम्ही चौकीदारी करतो. त्यात अजित पवारसुद्धा आहेत. भाजपाची कारस्थाने रोज आमच्याविरोधात होतायेत ती उधळणे आमचे काम आहे. अजित पवारांबाबत ज्या अफवा पसरवण्यात आल्या त्याला पूर्णविराम मिळाला आहे. महाविकास आघाडीच्या ऐक्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे आहे. मविआत संभ्रम आणि गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न काही जण करतायेत. तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी मविआला तडा जाणार नाही हे अजित पवार यांनी स्पष्ट आणि परखडपणे सांगितले असंही त्यांनी सांगितले.
तसेच केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीवर आहेत. आरजेडी, तृणमूल काँग्रेसवरही दबाव आणून पक्ष फोडले जातायेत हे सत्य आहे. त्यात लपवण्यासारखे काय आहे? या कारस्थानाविरोधात आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन खंबीरपणे लढणे गरजेचे आहे. त्यात अजित पवारांनीही भूमिका घेतली आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांना खोट्या गुन्ह्याखाली दडपशाही करून तुरुंगात टाकले आहे ते शरद पवारांनीही सांगितले आहे. सध्या कमळाचा सीझन नाही. मार्केटमध्ये दुसरी फुले येत आहेत. बरेच दिवस मी बाजारात कमळ बघितले नाही. ऑपरेशन मशाल, ऑपरेशन घड्याळ, ऑपरेशन हातसुद्धा होईल. राजकारणात काहीही होऊ शकते, प्रत्येकाचे दिवस येतात असं सांगत संजय राऊतांनी भाजपावर निशाणा साधला.
दरम्यान, आम्ही महाविकास आघाडीची बाजू मांडतोय. म्हणून म्हटलं मी चौकीदार आहे. मविआचे रक्षण करणे हे आमचे काम आहे. उगाच फाटे फोडू शकत नाही. उदय सामंत पळपुटे आहेत. अजितदादा पळपुटे नाहीत. त्यांनी खंबीरपणे भूमिका स्पष्ट केली. महाविकास आघाडी मजबूत आहे. जे पार्श्वभागाला पाय लावून पळालेल्यांनी मविआची चिंता करू नये. आपण माती खाल्ली इतर माती खाणार नाही असा टोलाही संजय राऊत यांनी सत्ताधारी शिवसेना-भाजपा नेत्यांना लगावला.