विशेष प्रतिनिधी मुंबई : मनसेचे सातपैकी सहा नगरसेवक फोडल्यानंतरही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपालाच लक्ष्य केले आहे. शिवसेनेने तीन कोटी रुपये देऊन नगरसेवक फोडल्याचा आरोप करणारे भाजपाचे खासदार किरिट सोमय्या यांना, ‘घोडेबाजाराचा आरोप गाढवांनी करू नये’ असा टोला ठाकरे यांनी हाणला.दिवसभराच्या नाट्यमय घडामोडीनंतर मनसेतून आलेल्या सहा नगरसेवकांच्या उपस्थितीत ठाकरे यांची सायंकाळी मातोश्रीवर पत्र परिषद झाली. ठाकरे यांचा सगळा रोख हा भाजपावर होता. भांडुपच्या पोटनिवडणुकीत भाजपा जिंकल्यानंतर आता मुंबई महापालिकेत भाजपाचा महापौर आणण्याच्या हालचाली सुरू झाल्याच्या बातम्या येत असतानाच मनसेचे सहा नगरसेवक फोडून ठाकरे यांनी आपली मांड पक्की करीत भाजपाला प्रत्युत्तर दिले. एका दिवसात कायदेशीर प्रक्रिया करून आम्ही सहा नगरसेवकांना आणले त्यावरून आमच्या ताकदीचा अंदाज आला असेलच, असा सूचक इशाराही ठाकरे यांनी दिला.नांदेडमध्ये शिवसेनेचे आमदार प्रताप चिखलीकर यांना गळाशी लावणाºया भाजपावर शिवसेनेच्या मुखपत्रातून सडकून टीका करण्यात आली आहे.मात्र, आपण मनसे फोडून तेच करीत आहात याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता ठाकरे पुन्हा भाजपावर बरसत म्हणाले की, त्यांनी केली ती खुद्दारी आणि आमची गद्दारी का? फोडाफोडीच्या आरोपांवर कोणाला फटका द्यायचा म्हणून नगरसेवकांना शिवसेनेत घेतलेले नाही, त्यांनीच सेना प्रवेशाची इच्छा व्यक्त केली. ते स्वगृही परतल्याचा आम्हाला आनंद आहे.मराठी माणसाची ताकद दाखवणारशिवसेनेत आलेले मनसेचे नगरसेवक दिलिप लांडे यावेळी म्हणाले की, मराठी माणसाच्या हितासाठी आम्ही शिवसेनेत आलो आहोत. मुंबईत शिवसेनेच्या मराठी महापौराला हटविण्याच्या हालचाली भाजपाने सुरू केल्याने मराठी माणसाची ताकद दाखविण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला.
घोडेबाजारांचा आरोप गाढवांनी करू नये: उद्धव ठाकरेंनी भाजपाला लगावला टोला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 4:02 AM