Shivsena Election Commission : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी 40 आमदारांना घेऊन बंड केल्यानंतर शिवसेनेत (Shivsena) दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटांकडून शिवसेना पक्षावर दावा केला जातोय. याप्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे, तर धनुष्यबाण चिन्हासाठीही केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. दरम्यान, आज सुनावणी पूर्ण झाली असून, आयोगाने पुढील सुनावणीसाठी सोमवार(दि. 30) ही तारीख दिली आहे.
शिवसेनेचे निवडणूक चिन्ह असलेल्या 'धनुष्यबाणा'साठी केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी सुरू असून, आजची सुनावणी पुढे ढकलली आहे. निवडणूक आयोगात आज याबाबत कोणताही निर्णय झाला नाही. आता सोमवारी म्हणजेच, 23 जानेवारी रोजी दोन्ही गटांना लेखी उत्तर सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल, देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला तर शिंदे गटाच्या वतीने महेश जेठमलानी, मनिंदर सिंह यांनी युक्तीवाद केला. सूमारे चार तास ही सुनावणी चालली.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेचे 'धनुष्यबाण' चिन्ह तात्पुरते गोठवले आहे. तसेच, ठाकरे गटाला 'मशाल' आणि शिंदे गटाला 'ढाल तलवार' चिन्ह देण्यात आले आहे. यानंतर आता धनुष्यबाण या मूळ चिन्हासाठी दोन्ही गटांनी दावा केला आहे. उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) पक्षप्रमुखपदाची मुदत 23 जानेवारीला संपणार आहे, त्यामुळे ही सुनावणी अत्यंत महत्त्वाची आहे.
कपिल सिब्बल काय म्हणाले?सुनावणीवेळी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल (Kapil Sibal) म्हणाले, घटनेनुसार शिंदे गटाची प्रतिनिधी सभा नाही. त्यामुळे राष्ट्रीय कार्यकारणीला मुदवाढ द्या अथवा निवडणूक घ्या, अशी मागणी सिब्बल यांनी केली आहे. यावेळी सिब्बल यांनी विधीमंडळ आणि राजकीय पक्षाची तुलना केली. विधीमंडळ पक्षातील संख्याबळाची निवडणूक आयोगासमोर माहिती दिली. घटनेनुसार प्रतिनिधी सभा आमच्याकडेच आहे, असा युक्तिवादही कपिल सिब्बल यांनी केला आहे.
महेश जेठमलानी काय म्हणाले?कपिल सिब्बल यांचा मुद्दा खोडून काढत शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी म्हणाले की, पक्षाची प्रतिनिधी सभा महत्वाची नसून लोकप्रतिनिधींची संख्या महत्वाची आहे. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभेत शिंदे गटाची सदस्य संख्या बघता आम्हालाच चिन्ह द्या, असा दावा जेठमलानी यांनी केला आहे.