ठाकरेंची सेना धाकटी!; आता काँग्रेसने डिवचले, मविआत कलगी-तुरा सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 08:38 AM2023-05-23T08:38:29+5:302023-05-23T08:38:47+5:30
शिवसेना गेल्यावेळी जिंकलेल्या १८ जागा लढवेलच शिवाय आणखी काही जागा मविआत मिळतील, असे विधान ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी केले होते. त्यावरून सध्या मविआत नाराजीनाट्य सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मविआत राष्ट्रवादी हा मोठा भाऊ असल्याचे विधान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केल्यानंतर आता काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवसेना (ठाकरे गट) हा मविआत तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे, या शब्दांत सोमवारी डिवचले. मोठा कोण यावरून मविआत कलगी-तुरा सुरूच असल्याचे चित्र आहे.
आघाडीमध्ये राष्ट्रवादी हाच क्रमांक एकचा पक्ष आहे. काँग्रेस दुसऱ्या स्थानावर आहे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे राष्ट्रवादी हा मविआत मोठा भाऊ असल्याचे म्हणणे यात गैर काहीही नाही, अशी प्रतिक्रिया चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
ते म्हणाले की, गेल्या काळात जे जे निकाल आले ते बघून जागावाटपाचा निर्णय होईल. भाजपला कोणता पक्ष पराभूत करू शकेल, यावर चर्चा होणे गरजेचे आहे. जागावाटपाकरिता गांभीर्याने बसून सूत्र ठरविले जाईल.
शिवसेना गेल्यावेळी जिंकलेल्या १८ जागा लढवेलच शिवाय आणखी काही जागा मविआत मिळतील, असे विधान ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी केले होते. त्यावरून सध्या मविआत नाराजीनाट्य सुरू आहे. राऊत यांनी सोमवारी जरा नरमाईचा सूर लावला. ते म्हणाले की, काही जागांची अदलाबदल करावी लागेल हे सत्य आहे. काही ठिकाणी तडजोडी कराव्या लागतील. तिन्ही पक्षांनी प्रत्येकी १६ जागा लढवाव्यात, असे अद्याप काहीही ठरलेले नाही.
वाटप मेरिटनुसार : पटोले
nमहाविकास आघाडीतील जागावाटप मेरिटनुसार होईल. सर्व बाजूंचा विचार करून जागा वाटप होईल आणि मेरिटवर निर्णय झाला तर अनावश्यक चर्चा थांबेल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी स्पष्ट केले.
nप्रत्येक पक्षाने जागांची चाचपणी केली पाहिजे यात काही गैर नाही, असे सांगताना पटोले यांनी प्रदेश काँग्रेसने संभाव्य जागांसाठी समित्या नेमल्याची माहिती दिली.
nराष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी कोणत्या पक्षातील कोणती व्यक्ती निवडून येऊ शकते, हा महत्त्वाचा निकष वापरला जाईल. तिन्ही पक्ष चर्चा करून ते ठरवतील, अशी प्रतिक्रिया दिली.
काँग्रेसची आज बैठक
महाविकास आघाडीच्या जागावाटपात काय भूमिका घ्यायची, यावर चर्चा करण्यासाठी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक मंगळवारी मुंबईत होणार आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण आदी नेते बैठकीला उपस्थित राहतील.