मुंबई : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन होईपर्यंत त्यांचे आणि आपले संबंध चांगले होते, हे सिद्ध करण्यासाठी जयदेव ठाकरे यांच्या विनंतीनुसार उच्च न्यायालयाने मंगळवारी तीन पत्रकारांशी साक्ष नोंदविली. मात्र आणखी काही पत्रकारांना साक्षसाठी बोलविण्याची विनंती न्यायालयाने अमान्य केली व पिता-पुत्राचे संबंध चांगले होते, यावर पत्रकार शिक्कामोर्तब करणार का? असा सवाल केला.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीविषयी व त्यांच्यातील आणि जयदेव यांच्यातील संबंधांविषयी २००९ व २०१२ मध्ये वर्तमानपत्रात अनेक वृत्ते प्रसिद्ध झाली होती. त्यावरून जयदेव यांनी संबंधित वृत्त लिहिणाºया काही पत्रकारांना न्यायालयात साक्षीदार म्हणून बोलाविले. त्यातील तिघे मंगळवारी न्यायालयात उपस्थित होते. मात्र, आणखी एका पत्रकाराची साक्ष नोंदवावी, असा आग्रह जयदेव यांच्या वकिलांनी न्या. गौतम पटेल यांना केला. मात्र, न्यायालयाने त्याला नकार दिला.शिवसेना म्हणून अनेक पत्रकारांनी तुमच्यातील अनेकांची मुलाखत घेतली असेल. प्रत्येकाला साक्ष देण्यासाठी बोलावणार का? वडील-मुलगा यांच्या चांगल्या संबंधावर पत्रकार शिक्कामोर्तब करणार का? असा सवाल न्या. पटेल यांनी जयदेव यांच्या वकिलांना केला.तुम्ही न्यायालयात आला आहात, त्यामुळे तुम्हीच पुरावे द्या. अनेक साक्षीदार बोलावून हा खटला पुढील २५ वर्षे चालविणार आहात का? २०१४ पासून हा दावा प्रलंबित आहे. त्यामुळे आणखी विलंब होता कामा नये. न्यायालयास उन्हाळ्याची सुट्टी लागेपर्यंत (४ मे) सर्व साक्षीदारांच्या साक्षी नोंदवून झाल्याच पाहिजेत. त्यानंतर, अंतिम युक्तिवादाला सुरुवात करू , असे म्हणत, न्यायालयाने या दाव्यावरील पुढील सुनावणी १२ मार्च रोजी ठेवली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १३ डिसेंबर २०११ रोजी केलेल्या इच्छापत्राला जयदेव ठाकरे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या इच्छापत्रात बाळासाहेबांनी त्यांची बहुतांश संपत्ती उद्धव ठाकरे यांच्या नावे केली आहे, तर त्यांचा नातू ऐश्वर्य याच्या नावावर ‘मातोश्री’चा पहिला माळा केला आहे. बाळासाहेबांनी या इच्छापत्रात जयदेव यांच्या नावाचा साधा उल्लेखही न केल्याने, जयदेव यांनी उच्च न्यायालयात दावा दाखल केला.पत्रकारांना प्रवासभत्ताएका वर्तमानपत्राचे संपादक, पत्रकार आणि छायाचित्रकाराची न्यायालयाने साक्ष नोंदविली. साक्षीसाठी आलेल्या पत्रकारांना प्रत्येकी साडेसात हजार रुपये, तर संपादकांना दिल्लीवरून साक्षीसाठी आल्याबद्दल विमानाचे प्रवासभाडे देण्याचे निर्देश जयदेव यांना दिले.
ठाकरे इच्छापत्र वाद : पिता-पुत्राच्या संबंधांचे दाखले पत्रकार देणार का? उच्च न्यायालयाने जयदेव ठाकरेंना सुनावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 3:21 AM