मुंबई : राज्यातील नाशिक, जळगाव, हिंगोली, बीड, पुणे अकोला, बुलडाणा जिल्ह्यात बुधवारी मध्यरात्रीनंतर व गुरुवारी झालेल्या पावसाने दोघांचा बळी घेतला आहे. बुलडाणा व बीड जिल्ह्यात वीज पडून प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला असून पाच बैल ठार झाले. पुढील २४ तासांत संपूर्ण राज्याला अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला असून उत्तर कोकणाला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
नांदेड जिल्ह्यात पांगरा येथील शेतकरी शंकर धोंडिबा घोरबांड (३०) हे शेतामध्ये हळद शिजवत असताना अचानक झालेल्या वादळी वाऱ्यामध्ये वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. वडोदा (जि. बुलडाणा) येथे झाडाखाली उभ्या असलेल्या ५४ वर्षीय रवींद्र वाघमारे यांचा वीज पडून मृत्यू झाल्याची घटना १९ एप्रिल रोजी घडली. बीड जिल्ह्यात सादोळा व पवारवाडी या दोन गावांच्या शिवारात बुधवारी रात्री वीज कोसळून पाच ५ बैल ठार झाले. हिंगोली जिल्ह्यातही गडगडाटासह पाऊस झाला.
नाशिकलाही वादळी पाऊसबागलाण तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे गुरुवारी पहाटे वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. फकीरवाडी आदिवासी वस्तीजवळ बाभळीच्या झाडावर वीज पडून झाड जळाले. पाटणादेवी (जि. जळगाव) येथील जिल्हा परिषद शाळेचे पत्रे वादळामुळे उडाले.
नागपूरलाही झोडपले वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसाने गुरुवारी नागपूर शहरालाही झोडपले. काही ठिकाणी गारपीटही झाली. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पड़ली.
उष्णतेच्या लाटेचा इशारा- मुंबईसह राज्यभरातील नागरिकांनी उष्णतेच्या लाटेचा तडाखा गुरुवारीही अनुभवला. - आज, शुक्रवारपासून पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्याचा प्रभाव कमी होईल. त्यामुळे मुंबईतील चटके कमी होण्याची शक्यता आहे. - पुढील २४ तासांसाठी संपूर्ण राज्याला अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला असून उत्तर कोकणाला पुढील २४ तासांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
कुठे किती कमाल तापमान?जळगाव ४१.७ सोलापूर ४१.१ परभणी ४० बारामती ३८.८ सांगली ३८.६ पुणे ३८.४ सातारा ३७.६ मुंबई ३७.३ कोल्हापूर ३७.१ नाशिक ३६.९