गोपालकृष्ण मांडवकर/लोकमत न्यूज नेटवर्कतोंडले बोंडले (जि. सोलापूर) : आषाढ शुद्ध अष्टमीच्या मुहूर्तावर माउलींच्या अश्वाने शनिवारी सकाळी तिसरे गोल रिंगण पूर्ण केले. रिंगण सोहळ्याने हा परिसरच भाविकतेच्या सुवासाने जणू गंधाळून गेला.वारकऱ्यांचे टाळ-मृदंग टिपेला पोहोचले होते. बेफामपणे नाचणारी वारकऱ्यांची माउली रिंगणस्थळाजवळ स्थिरावली. झेंडेधारी, त्यापाठोपाठ अब्दागिरी घेतलेले मानकरी प्रवेशले. त्यापाठोपाठ जयघोषात माउलीची पालखी निघाली. गोल प्रदक्षिणा घालून माउली सजविलेल्या आसनावर विराजमान झाली, रिंगणमार्गावर आळंदीतील राजश्री जुन्नरकर यांनी सुरेख रांगोळ्या घातल्या.परंपरेनुसार माउलीच्या रथापुढे चालणाऱ्या भोपळे दिंडी क्रमांक १४ च्या जरीपटक्याचे निशाण उंच धरून गोल रिंगण घातले. त्यानंतर स्वाराच्या अश्वाने दौड घेतली. ही दौड अर्ध्यावर आली असतानाच माउलीचा अश्व चौखूर उधळला. पुढे निघाला. अश्वाने दोन फेऱ्या पूर्ण केल्या. ‘माउली...माउली...’ असा अखंड गजर, हरिनाम, टाळ्या यामुळे वातावरण नादमय झाले.माउली विराजमान असलेल्या अश्वाच्या टाचांनी पुनित झालेली माती लक्षावधी भाविकांच्या माथ्यावर चढली. रंगले उडीचे खेळरिंगण पूर्ण होताच चोपदारांना सर्व दिंडीप्रमुखांना उडीच्या खेळासाठी पाचारण केले. एवढे अंतर पायी चालून जणू नवी ऊर्जा अंगी साठवून घेण्यासाठी सर्व दिंड्या माउलीच्या पालखीभोवती शिस्तीने रिंगण लावून बसल्या. चोपदारांच्या सूचनेवरून टाळकरी आणि मृदंगाचा ताल सुरू झाला. त्यात विणावादनाच्या तारा झंकारल्या. मुखात ‘ज्ञानोबा-तुकाराम’ अखंड गजर सुरू झाला. संपूर्ण वातावरणच भक्तीरसात न्हाऊन निघाले. सुमारे अर्धा तास उडीचा खेळ चालला. वैष्णवांची मांदियाळी पंढरपुरासमीप आलीबाळासाहेब बोचरे/लोकमत न्यूज नेटवर्कसोलापूर : एक गाऊ विठू तुझे नावआणिकाचे काम नाहीआषाढी वारी कधी येईल आणि सावळ्या पांडुरंगाला कधी एकदा भेटेन या उत्कट ओढीने गेले काही दिवस ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता हरिनामाचा जयघोष करत विविध संत आणि सज्जनांच्या पालख्यांसोबत पंढरीच्या दिशेने निघालेली वैष्णवांची मांदियाळी पंढरपुरासमीप आली आहे. सुमारे पाच लाखांचा वैष्णवांचा दळभार पंढरपूर तालुक्यात दाखल झाला आहे. आळंदीहून आलेली संत ज्ञानेश्वर माउली, देहूहून आलेली जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी यांच्यासमवेत सुमारे चार लाख वारकरी असून या दोन्ही पालख्यांनी शनिवारी पंढरपूर तालुक्यात प्रवेश केला. माउली भंडीशेगाव येथे तर तुकाराम महाराजांची पालखी वाडीकुरोली येथे मुक्कामी गेली. याच मार्गाने संत सोपानदेवही पंढरपूर तालुक्यात दाखल झाले असून त्यांच्यासमवेत १५ हजार वारकरी आहेत. त्याचबरोबर संताजी महाराज जगनाडे, बालयोगी, चौरंगीनाथ, संभाजी महाराज, सेना महाराज अशा विविध पालख्यांनीही याच मार्गाने पंढरपूर तालुक्यात प्रवेश केला आहे. अहमदनगर मार्गाने शनिवारी संत निवृत्तीनाथ व संत एकनाथांच्या पालख्यांनी प्रवेश केला असून करकंब येथे पालख्या मुक्कामी आल्या आहेत. सुमारे ५५ हजार वारकरी त्यांच्यासमवेत आहेत. संत मुक्ताईची पालखी शनिवारी पंढरपुरात दाखल झाली आहे. संत एकनाथांच्या पालखीसाठी कौठाळी येथे चंद्रभागा नदीवर पूल बांधण्यात आला आहे. हे काम प्रशासनाने वेळेआधीच आणि चांगले केले आहे. त्यामुळे एकनाथांचा मार्ग सुकर झाला आहे. उर्वरित मार्गात असलेल्या गैरसोयीही दूर करण्यासाठी प्रशासनाने पावले उचलण्याची गरज आहे. - रघुनाथबुवा गोसावी पालखीवाले सोहळाप्रमुख, संत एकनाथ महाराज पालखी
ठाकूरबुवा समाधी परिसर गंधाळला
By admin | Published: July 02, 2017 4:07 AM