ठाणे : स्थानिक संस्था करामध्ये दीडशे कोटी रुपयांची तूट अपेक्षित असल्यामुळे ठाणे महानगरपालिकेच्या २०१५-१६ च्या अंदाजपत्रकात विविध विभागांना वसुलीचे जे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे, त्यामध्ये कुठलीही सूट मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधित विभागप्रमुखांनी विहित केलेले आर्थिक वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा कसोशीने प्रयत्न करावा, अशा सूचना महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सर्व विभागांना दिल्या आहेत. विशेष म्हणजे याचा परिणाम आता शहरातील कामांवरदेखील होणार आहे. जी कामे महत्त्वाची असतील, त्यांनाच प्राधान्य देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार, ज्या फाइल महत्त्वाच्या नसतील, त्या होल्डवर ठेवण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. महापालिका आयुक्त जयस्वाल यांनी सर्व उपायुक्त, विभागप्रमुख आणि सहायक आयुक्त यांची बैठक घेऊन विभागनिहाय वसुलीचा आढावा घेतला. यामध्ये स्थानिक संस्था करामध्ये अंदाजे १५० कोटींची तूट या आर्थिक वर्षात येणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे मालमत्ता कर, पाणी कर, अग्निशमन दल, शहर विकास विभाग, स्थावर मालमत्ता आणि जाहिरात विभागांनी त्यांना दिलेले वसुलीचे उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावेत, असे निर्देश त्यांनी दिले. याबाबत, प्रत्येक विभागप्रमुखाने आपल्या स्तरावर वसुलीचा आढावा घेऊन वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी काय करायला हवे, त्यासाठी कोणत्या उपाययोजना राबविण्याची गरज आहे, याची माहिती एका आठवड्यात सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. (प्रतिनिधी)सरकारकडून अनुदान येईपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. परंतु, त्यामुळे पालिकेचा गाडा पुन्हा रुळांवरून उतरल्याने खर्चाचे नियोजन आखण्याचे काम आयुक्तांनी हाती घेतले आहे. जी कामे महत्त्वाची असतील, त्यांनाच प्राधान्य देण्याचे निश्चित केले आहे. दुसरीकडे काही महत्त्वाच्या नसलेल्या फाइल मात्र आता पुन्हा होल्डवर ठेवण्याचेही काम सुरू झाले आहे.
ठामपाचा आर्थिक गाडा गडगडला
By admin | Published: August 27, 2015 2:05 AM