ठाणे : शहरात रविवारी झालेल्या पावसामुळे घोडबंदर परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले होते. बांधकाम व्यावसायिकांनी तेथील पाण्याचे नैसर्गिक प्रवाह बुजवल्याने ही परिस्थिती उद्भवली, असा आरोप स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी सदस्यांनी केला. परंतु, पालिकेने याचे खापर एमएसआरडीसीवर तर एमएसआरडीसीने पालिकेवर फोडले. मात्र, या यंत्रणांमधील समन्वयाच्या अभावाचा फटका येथील रहिवाशांना बसत आहे. त्यामुळे यासंदर्भात काय उपाययोजना करणार, हे एमएसआरडीसीने लेखी स्वरूपात पालिकेला न सांगितल्यास टोल बंद केला जाईल, असा इशारा स्थायी समिती सदस्यांनी दिला. त्यावर, पाण्याचे प्रवाह बुजवणाऱ्यांवर कारवाईचे आदेश स्थायी समिती सभापती संजय वाघुले यांनी दिले. मुसळधार पावसामुळे रविवारी हिरानंदानी इस्टेट व आनंदनगर परिसरात पाण्याचे तळे साचले होते, असा मुद्दा काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक मनोज शिंदे यांनी उपस्थित केला. पालिका प्रशासनाचे योग्य नियोजन नसल्याने पाण्याचा निचरा होत नाही, असा आरोप त्यांनी केला. या सर्व प्रकाराबद्दल प्रशासनाने खुलासा करावा, अशी मागणी सदस्यांनी केली. त्यानंतर, उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांनी पाणी साचल्याची वस्तुस्थिती मान्य करताना पालिका प्रशासनानेही चोख भूमिका बजावल्याचे स्पष्ट केले. घोडबंदर रोड तयार करताना बांधलेले कलव्हर्ट हे लहान असल्याने पाण्याचा निचरा होत नसल्याची माहिती त्यांनी बैठकीत दिली. यासंदर्भात २०१२ मध्ये एमएसआरडीसीला पत्रही दिले आहे, असे बुरपुल्ले यांनी स्पष्ट केले. एमएसआरडीसीने ‘आयआरबी’ कंपनीला घोडबंदर रोडचे काम दिले होते. कंपनीने काम करताना या गोष्टी लक्षात घ्यायला हव्या होत्या, असा मुद्दा नजीब मुल्ला यांनी उपस्थित केला. याचा त्रास मात्र नागरिकांना झाला आहे. त्यामुळे काय उपाययोजना करणार आहे, हे एमएसआरडीसीने महिनाभरात लेखी स्वरूपात महापालिकेला न कळवल्यास टोल बंद करण्याचा निर्णय घ्यावा, अशी सूचना मुल्ला यांनी केली. यासंदर्भात पालकमंत्र्यांना पत्र देण्याची मागणी करून तशा प्रकारचा ठराव बैठकीत करण्यात आला. दुसरीकडे एमएसआरडीसीने पालिका प्रशासनाचे मुद्दे खोदून काढले आहेत. २००७ मध्ये घोडबंदर रोड बांधल्यानंतर एवढ्या वर्षात कधीच पाणी साचले नाही. पालिकेने सर्व्हिस रोडचे काम करताना मोठे कलव्हर्ट बांधले आहेत. त्यामुळे योग्य समन्वय झाला नाही. महापालिकेने पत्र दिल्यानंतर या कामासाठी निधीची तरतूद करावी लागेल, असे कळवले होते. त्यामुळे महापालिकेने हे काम केले तरी चालेल, असे लेखी उत्तर पालिकेच्या पत्राला दिले होते. मात्र, त्यांच्याकडून त्यानंतर कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही, असे एमएसआरडीसीच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान, सहा महिन्यांत कोणतेही काम करणे शक्य नाही, असे एमएसआरडीसीने स्पष्ट केल्याने हा वाद चिघळण्याची चिन्हे आहेत. >निधी मिळाल्यास काम : एमएसआरडीसीभिवंडीफाटा ते घोडबंदर जंक्शनपर्यंत ३२ कलव्हर्ट आहेत. त्यातील १६ ते १७ कलव्हर्टचे रिमॉडेलिंग करण्यात आले आहे. उर्वरित कलव्हर्टचे रिमॉडेलिंग करण्याचे प्रस्तावित आहे. निधी उपलब्ध झाल्यास ते केले जाईल, अशी माहिती एमएसआरडीसीने दिली. भरतीच्या वेळी खाडीचे पाणी खाडीजवळील नाल्यामध्ये घुसू नये तसेच नाल्यातील पाणी खाडीमध्ये जाण्यासाठी शहरात १० ठिकाणी टायडल गेट बांधण्याचे प्रस्तावित होते. मात्र, हे कामही रखडले आहे, असा मुद्दा नजीब मुल्ला यांनी उपस्थित केला.टायडल गेटबरोबर पम्पिंग स्टेशनही बांधणे गरजेचे आहे. यासाठी निधीची तरतूद केली नव्हती, असे प्रशासनाने स्पष्ट केल्यानंतर हे काम करावे, अशा सूचना या बैठकीत देण्यात आली.
ठामपाच्या स्थायीत खडाजंगी
By admin | Published: August 04, 2016 2:47 AM