ठाणे : महिला चालकांना व्यवसायाची नवी संधी देणाऱ्या अबोली रिक्षांचे जाळे ठाण्यातील रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात पसरत आहे. रात्रीअपरात्री महिलांना सुरक्षित प्रवासाची सोय उपलब्ध करून देणाऱ्या या रिक्षांची संख्या वाढत असून गुरुवारी यात आणखी २५ रिक्षांची भर पडली.महिलांना आॅटोचालक म्हणून काम करण्याची संधी मिळावी, त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्या आणि यानिमित्ताने महिलांना सुरक्षित प्रवास उपलब्ध व्हावा, यादृष्टीने महिलांसाठी अबोली रिक्षांची संकल्पना समोर आली. या रिक्षांच्या रंगसंगतीवर जून २०१६ मध्ये शासनाने शिक्कामोर्तब केले होते. हा उपक्रम राज्यभरात राबवला तरी त्याची सुरुवात ठाण्यातून करण्यात आली. या उपक्रमास महिलांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. सध्या ठाण्यात ५० पेक्षा जास्त अबोली रिक्षा धावत आहेत. महिला प्रवाशांना या रिक्षा सहज ओळखता याव्या, यासाठी रिक्षांचा रंग पारंपरिक आॅटोरिक्षांपेक्षा वेगळा ठेवला आहे. वायफाय, रेडिओ आणि जीपीएस सुविधांनी सज्ज अशा २५ अबोली आॅटोरिक्षा गुरुवारी ठाणे परिवहनकडे नोंदणीसाठी आल्या. या रिक्षांची नोंदणी आणि मीटरचे प्रमाणीकरण या वेळी केले. अबोली रिक्षांमध्ये असलेली जीपीएसची सुविधा महिला प्रवाशांसाठी सोयीची आहे. रात्रीअपरात्री प्रवास करताना कोणतीही अडचण आल्यास एका क्लिकसरशी रिक्षाचा नंबर, नेमके स्थळ ही सर्व माहिती परिवहनसह पोलीस नियंत्रण कक्षाला पोहोचते. २५ अबोली रिक्षांची नोंदणी गुरुवारी करण्यात आली. या रिक्षांचे मीटरही तपासण्यात आले. आता वाहन चालवण्याचे परवाने आणि बॅच नंबर नियमानुसार त्यात्या महिलांना दिले जातील. महिला प्रवाशांसाठी ही अतिशय चांगली सुविधा आहे. या माध्यमातून रोजगाराची संधीही महिलांना उपलब्ध झाली आहे.-हेमांगिनी पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे
ठाण्यात ‘अबोली’ जाळे!
By admin | Published: January 20, 2017 2:33 AM