लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाण्याचा सुपुत्र अमेय वायंगणकरने दुबईच्या बुडोकान कप - २०१७ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तगड्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून भारताला रजतपद मिळवून दिले. अमेयची निवड या वर्षाअखेरीस मलेशिया आणि इंग्लंडमध्ये होऊ घातलेल्या कराटेच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत झाली असून तो भारताचे प्रतिनिधीत्त्व करणार आहे. बुडोकान कप - २०१७ च्या माध्यमातून विविध देशांतील मार्शल आर्टसच्या खेळाडूंना आपली प्रतिभा दाखविण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. या वर्षी या स्पर्धेत भारत, आॅस्ट्रेलिया, दुबई आणि नेपाळ या देसातले खेळाडू सहभागी झाले होते. त्यांचा मुकाबला करून रजतपदक जिंकून अमेयने विजयश्री खेचून आणली. त्याच्या क्रीडा नैपुण्याबद्दल ठाणे नगरपालिकेने त्याचा ‘ठाणे गुणीजन पुरस्कार’ देऊन सन्मान केला होता. मार्शल आर्टस आपल्याला विपरीत परिस्थितीत स्वसंरक्षणाबरोबर सर्व प्रकारच्या ताणतणाव, दबावाचा सामना करायला शिकवतात. अपिरिचित व्यक्तीने अचानक केलेल्या हल्ल्याचा उत्स्फुर्त प्रतिकार करुन स्वत:चे - इतरांचे संरक्षण आणि प्रतिआक्रमण करुन त्या हल्लेखोराला नामोहरम करणे यातून शिकता येते, जे आजच्या प्रचंड धकाधकीच्या जीवनात सर्वांच्याच गरजेचे आहे. या स्पर्धेत एकाहून एक तयारीच्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सामना तोही तितक्याच आवडीने उपस्थित राहिलेल्या हजारो प्रेक्षकांच्या समोर केल्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला आहे.
ठाण्याचा अमेय ठरला रजतपदाचा मानकरी!
By admin | Published: June 07, 2017 4:07 AM