ठाणे : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महामार्गालगतच्या बारना सील ठोकण्याचे काम सुरू झाल्याने त्याविरोधात ठाण्यातील बारनी दारूविक्री बंद केली. काही बारही बंद ठेवले आहेत. ते आम्ही अजून २० दिवस बंद ठेवू शकतो, असे हॉटेल आणि बार ओनर असोसिएशनने स्पष्ट केले आहे.यातून मार्ग काढण्यासाठी असोसिएशन लोकप्रतिनिधींपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांना भेटणार आहे. मध्य प्रदेश आणि राज्यस्थान सरकारने ज्या पद्धतीने अनेक राज्य महामार्गांचा दर्जा काढून घेतला, तसा मार्ग महाराष्ट्र सरकारनेही काढावा आणि हॉटेल व्यवसाय वाचवण्याची मागणी करणार असल्याचे असोसिएशन उपाध्यक्ष कुशल भंडारी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. यामुळे अवैध दारू विक्रीची शक्यता नाकारता येत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.सरकारने दिलेल्या परवान्याप्रमाणे ही हॉटेल सुरु होती. कर्ज काढून अनेकांनी हॉटेल सुरू केली. बहुतांश हॉटेल दारूविक्रीवर अवलंबून आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्बंधांमुळे ग्राहकांची संख्याही कमी होणार आहे. याचा परिणाम आमच्यावर होईल. हॉटेलसाठी भाजी पुरवणाऱ्यांवर होईल. हॉटेलमध्ये काम करणाऱ्यांचे पगार, लाईट बिल, कर कसे भरणार असेही प्रश्न असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे वेळीच यावर तोडगा काढला नाही, तर या व्यवसायाशी जोडलेले सर्वजण देशोधडीला लागतील, अशी भीती त्यांनी वर्तवली. बंदीची झळ जास्तीत जास्त आणखी १० ते २० दिवस सहन करण्याची क्षमता या व्यावसायिकांची आहे. त्यामुळे हा व्यवसाय वाचविण्याची जबाबदारी शासनाची आहे. यासाठी लवकरच ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
ठाण्यातील बार आणखी २० दिवस राहणार बंद
By admin | Published: April 03, 2017 4:20 AM