ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि.26 - इमामवाडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार शेखर तावडे यांना शुक्रवारी हृदयविकाराचे एकापाठोपाठ दोनदा तीव्र झटके आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर रामदासपेठेतील एका खासगी ईस्पितळात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
नवीन पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी शुक्रवारी सकाळी पदभार सांभाळला. त्यानंतर त्यांनी वरिष्ठ अधिकारी तसेच ठाणेदारांची बैठक घेतली. ही बैठक आटोपून ठाणेदार तावडे दुपारी ३ च्या सुमारास ठाण्यात परतले. आपल्या कक्षात बसून असताना त्यांना अचानक छातीत कळ आली. ठाण्यातील सहका-यांनी तावडे यांना प्रारंभी जवळच्या एका खासगी ईस्पितळात नेले. तेथून त्यांना रामदासपेठेतील एका ईस्पितळात हलविण्यात आले. रस्त्यात असतानाच त्यांना मिरगीसारखा झटका आला. त्यानंतर त्यांना पुन्हा हृदयविकाराचा तीव्र धक्का आला. रामदासपेठेतील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना कृत्रिम श्वासोस्वासावर (व्हेंटिलेटरवर) ठेवण्यात आले आहे. दरम्यान, त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे कळाल्याने पोलीस उपायुक्त जी. श्रीधर यांच्यासह अनेक अधिका-यांनी रुग्णालयात धाव घेऊन प्रकृतीबाबत डॉक्टरांशीही चर्चा केली. तावडे यांचे कुटुंबीय मुंबईला राहत असून, त्यांना माहिती देऊन नागपुरात बोलवून घेण्यात आल्याचे उपायुक्त जी. श्रीधर यांनी सांगितले.