ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेची एक हाती सत्ता प्राप्त करण्याचे स्वप्न पाहाणा-या भारतीय जनता पार्टीचे (भाजपा) स्वप्न भंगले आहे. ५३ सदस्यसंख्ये पैकी शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन ३६ सदस्यांच्या पाटबळावर जि.प.ची बिनविरोध सत्ता स्थापन केली आहे. सेनेच्या शहापूर येथील मंजुषा जावध अध्यक्ष तर राष्ट्रवादीचे मुरबाड येथील सुभाष पवार उपाध्यक्ष पदी विराजमान झाले आहेत.ठाणे जिल्हा विभाजनानंतर सुमारे साडे तीन वर्षं प्रशासकीय सत्ता असलेल्या ठाणे जिल्हा परिषदेवर प्रथमच शिवसेनेने सत्ता प्रस्तापित करून इतिहास घडवला आहे. स्वत:च्या २६ सदस्यांसह राष्ट्रवादीचे दहा सदस्यांना सोबत घेऊन जि.प.च्या ५३ पैकी ३६ सदस्यांच्या पाटबळावर शिवसेने जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन केली. यास्पर्धेत भाजपाच्या १५ सदस्यांसह एक अपक्ष आणि उर्वरित एक काँग्रेस सदस्याचे पाटबळ मिळवण्याच्या प्रयत्नानंतरही बहुमतासाठी एक सदस्य फोडणे शक्य न झाल्यामुळे भाजपाला जि.प.ची सत्ता मिळवता आली नाही. तत्पुर्वी भाजपाने मुरबाडच्या नंदा उघडा यांची अध्यक्षपदासाठी तर भिवंडीचे अपक्ष उमेदवार अशोक घरत यांना उपाध्यक्ष पदाची उमेदवार दिली होते. मात्र दुपारी तीन वाजेच्या सुमार या दोन्ही उमेदवारांनी सभागृहात येऊन उमेदवारी मागे घेत अध्यक्षपदाच्या जाधव व उपाध्यक्षपदाचे पवार यांचा बिनविरोध विजयाचा मार्ग मोकळा करून दिला आणि सेना - राष्ट्रवादी जि.प.वर प्रथमच सत्तेत एकत्र आले.येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनमध्ये ही निवड प्रक्रिया ठाणे उपविभागीय अधिकारी तथा पिठासन अधिकारी सुदाम परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतल्यानंतर परदेशी यांनी जाधव यांच्यासह पवार यांचा बिनविरोध विजय झाल्याचे अधिकृतरित्या घोषीत केले. यावेळी सभागृहात केवळ शिवसेना व राष्ट्रवादीचे सदस्य उपस्थित होते. भाजपाचे सदस्य यावेळी उपस्थित नव्हते.यानंतर मात्र जिल्हाधिकारी कार्यालयात आवारात सेनेच्या मावळ्यांनी एकच गर्दी करून घोषणा बाजी केली. याशिवाय अध्यक्ष उपाध्यक्षांनी वाजतगाजत जिल्हा परिषदेत आणून त्यांना खुर्चीत विराजमान केले. याविजयी प्रसंगी बांधकाम राज्यमंत्री व ठाणे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारणा केली असता ‘ राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी स्थानिक नेत्यांच्या विचारास अनुसरून ही निवडणूक एकत्र लढवण्यास सहमती दर्शविली आणि आम्ही जिल्हा परिषदेत एकत्र सत्ता स्थापन केली’ असे त्यांनी स्पष्ट केले. तर जिल्ह्याच्या विकासा करीता राष्ट्रवादी व शिवसेना एकत्र येऊन जिल्हा परिषदेव्दारे ग्रामीण भागाचा विकास करणार असल्याचे राष्ट्रवादीचे सरचिटणीस प्रमोद हिंदुराव यांनी सांगितले. याशिवाय अध्यक्षा जाधव व उपाध्यक्ष पवार यांनी देखील सर्वाना एकत्र घेऊन ग्रामीण भागातील पाणी टंचाई सारख्या विविध जटील समस्या सोडवून जिल्ह्याचा विकास करणार असल्याचे सुतोवाच केले. यावेळी जेष्ठ माजी आमदार गोटीराम पवार यांच्यासह आमदार रवी फाटक, डॉ. बालाजी किणीकर, गोपाळ लांडगे राष्ट्रवादीचे अंबरनाथ अध्यक्ष काशिनाथ पाटील, शहापूरचे दशरथ तिवरे आदी सेना व राष्ट्रवादीचे जेष्ठ, कनिष्ठ नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ठाणे जि. प.वर शिवसेना - राष्ट्रवादीची सत्ता; सेनेच्या मंजुषा जाधव अध्यक्ष तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे सुभाष पवार बिनविरोध विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 7:20 PM
स्वप्न पाहाणा-या भारतीय जनता पार्टीचे (भाजपा) स्वप्न भंगले आहे. ५३ सदस्यसंख्ये पैकी शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन ३६ सदस्यांच्या पाटबळावर जि.प.ची बिनविरोध सत्ता स्थापन केली आहे.
ठळक मुद्देबहुमतासाठी एक सदस्य फोडणे शक्य न झाल्यामुळे भाजपाला जि.प.ची सत्ता मिळवता आली नाहीराष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी स्थानिक नेत्यांच्या विचारास अनुसरून ही निवडणूक एकत्र लढवण्यास सहमतीठाणे जिल्हा परिषदेवर प्रथमच शिवसेनेने सत्ता प्रस्तापित करून इतिहास घडवला आहे