ठाणे - Eknath Shinde on Anand Dighe ( Marathi News ) आनंद दिघेंना ठाणे जिल्हाप्रमुख पद सोडायला भाग पाडलं जात होते. पदाचा राजीनामा देण्याचे फर्मान आले होते. एवढ्या यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहचल्यानंतर ते पद काढून घेणे किती जिव्हारी लागले असेल. दिघेसाहेबांचे पद काढले तर ठाणे जिल्हा, नाशिक, पालघर इथे एक माणूस तुमच्याकडे राहणार नाही असं सांगितले तेव्हा शांत झाले असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिघेंच्या आयुष्यातील अनेक घटनांवर गौप्यस्फोट केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, नेते पदासाठी जेव्हा आनंद दिघेंनी राज ठाकरेंचं नाव पुढे केले, राज ठाकरे यांनी फार मेहनत घेतली असून त्यांच्या नावाचा विचार व्हावा असं म्हटलं होते. त्यानंतर फटाफट दिघेसाहेबांना फोन आले, त्यानंतर दिघेसाहेब गाडीत बसून निघून गेले आणि पुढील २ दिवस ते कुणालाही भेटले नाहीत. एवढा त्यांना मानसिक त्रास झाला, त्यामागे कोण होते? दिघेसाहेब गेल्यानंतर मी जेव्हा पहिल्यांदा उद्धव ठाकरेंना भेटलो तेव्हा मला काय प्रश्न विचारावा, ते म्हणाले, आनंद दिघेंची प्रॉपर्टी कुठे कुठे आहे?, फकीर माणूस, दोन्ही हाताने सर्व वाटणारा माणूस, ज्या माणसाने शाखेत आयुष्य काढले, ना घर, ना बिल्डिंग असं मी म्हटलं. त्यावेळी आपण चुकीच्या ठिकाणी आहे असं मला वाटलं. परंतु नाईलाजास्तव काम करावं लागले असं त्यांनी म्हटलं.
तसेच ठाणे हा धर्मवीर आनंद दिघेंचा बालेकिल्ला आहे. नरेश म्हस्केंसारखा एक लढवय्या कार्यकर्ता दिला आहे. राजन विचारे कार्यकर्त्याची विचारपूसही करत नव्हते. एकनाथ शिंदे उमेदवार म्हणून कार्यकर्त्यांना काम करायला मी लावत होतो. हा महायुतीचा बालेकिल्ला आहे. राजनचा सीझन आता संपला, नरेशचा विजय होणार चांगला, आता महापालिका नव्हे तर लोकसभा संसद भवन बघा, म्हस्के गेल्या अनेक वर्षापासून काम करतायेत. आपल्याकडे एकाहून एक चांगले पदाधिकारी आहेत. सगळ्यांना एकाच ठिकाणी पाठवून चालणार नाही. आनंद दिघेंचा हा ठाणे जिल्हा आहे. ठाणे जिल्ह्याबाबत आमचं भावनिक नाते आहे असं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान, २ वर्षापूर्वी आपण करेक्ट कार्यक्रम केला असून आता आपला फक्त विकासाचा अजेंडा आहे. त्यांच्याकडे ना झेंडा, ना अजेंडा आणि ना नेता, एक एक वर्ष पंतप्रधानपद वाटून घ्यायला ते महापौरपद आहे का?, कार्यकर्त्यांमधून मी इथं आलोय. मी जिथे बसतो, तिथे विरोधकांचा बाजार उठवून टाकतो. आपण कार्यकर्ते आहोत. मुख्यमंत्री असलो तरी माझ्यातला कार्यकर्ता आजही काम करतोय. मुख्यमंत्रिपदाची हवा ज्यांच्या डोक्यात गेली त्यांचे काय झाले सर्वांना पहिले. मुख्यमंत्र्यांच्या सहीला एवढी किंमत की लोकांचे जीव वाचतात, अडीच वर्षात मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पैसे दिले नाहीत असा टोला शिंदेंनी लगावला.
राजन विचारेंनी स्वत:हून राजीनामा दिला नव्हता...
राजन विचारे आले, त्यांनी मला पद दिले असं सिनेमात खोटे होते, विचारेंनी राजीनामा दिला नाही. दुसऱ्या सिनेमात खरं समोर आणणार आहे. सिनेमात जे काही दाखवलं, राजन विचारे स्वत:हून आले, त्यांनी पद दिले हे खोटे आहे. दुसऱ्या सिनेमात ते खरे दाखवणार आहे. राजन विचारेंना राजीनामा द्यायला सांगितला परंतु त्यांनी दिला नाही. राजन विचारे रघुनाथ मोरेंकडे गेले. तेव्हा मोरेसाहेब समजूतदार होते. त्यांनी म्हटलं, दिघेंनी जो निर्णय घेतला तो विचार करून आणि विशिष्ट परिस्थितीत घेतला आहे. तु बिल्कुल काही न बोलू नको असं त्यांनी सांगितले. राजन विचारे दिघेसाहेबांना खूप काही बोलले. त्यानंतर आनंदाश्रमात साहेबांनी राजन विचारेंना त्यांच्या भाषेत समजावलं. राजन विचारे हे दिघेसाहेबांचे नकली शिष्य आहेत. दिघेसाहेबांना ज्याने कायम त्रास दिला, ते आम्हाला माहिती आहे. दिघेंसाहेबांपुढे प्रतिस्पर्धी उभं करण्याचं काम करत होते असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं.