...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2024 11:33 AM2024-05-12T11:33:30+5:302024-05-12T11:34:53+5:30
Loksabha Election - राजन विचारे यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत जितेंद्र आव्हाड यांनी गद्दारीवरून एकनाथ शिंदेंसह अजित पवारांवर जोरदार निशाणा साधला.
ठाणे - Jitendra Awhad on Ajit Pawar ( Marathi News )अजित पवार आता सगळ्यांना डोस देत सुटलेत, तुला पाडीन, तुला पाडीन करतायेत, मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही? लोकशाहीत एवढा माज कसला दाखवता? ज्या बापाने मला घडवलं, त्या बापाचा हात सोडताना ह्दयात जराही कालवाकालव झाली नाही? असा हल्लाबोल जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर केला आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, १९९१ साली अजित पवारांना महाराष्ट्रात कोण ओळखतं होतं? त्या अजित पवारांना लोकसभेची उमेदवारी दिली आणि संसदेत पाठवले. त्यानंतर सातत्याने सत्तेच्या वर्तुळात ठेवले, ४ वेळा उपमुख्यमंत्री बनवलं. संघटनेचे पद का घेतले नाही, कधीतरी मला पक्षाचे अध्यक्ष करा, मला पक्ष वाढवायचाय असं का म्हटलं नाही. तुम्हाला केवळ सत्ता हवी होती. त्या सत्तेसाठी तुम्ही शरद पवारांना घराच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि स्वत: पक्ष ताब्यात घेतला असा आरोप त्यांनी केला.
त्याशिवाय दुसरीकडे ज्या मातोश्रीने आईसारखं प्रेम दिलं, ज्या मातोश्रीने भरभरून दिले त्यांनी मातोश्री फोडण्याचं काम केले. या दोन्ही गद्दारी महाराष्ट्राला कधी आवडणार नाही. राज्यात २ गद्दारी ओळखली जाते, शिवाजी महाराजांच्या काळातला खंडोजी खोपडे आणि सूर्याजी पिसाळ, यांच्या औलादींना महाराष्ट्राने कधी ओळख दिली नाही, मोठेपणा दिला नाही. तसेच या नवीन सूर्याजी पिसाळ, खंडोजी खोपडेंना या निवडणुकीत कायमचे संपवून टाका, येणाऱ्या कुठल्याच निवडणुकीत जागा देऊ नका असं सांगत आव्हाडांनी अजित पवारांसह एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला.
दरम्यान, महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्या समर्थनार्थ घेतलेल्या सभेत जितेंद्र आव्हाड बोलत होते, ते म्हणाले की, आम्हाला संविधान टिकवायचे आहे, भाजपाला संविधानच मान्य नाही. नवीन संसद भवनाचं उद्घाटन झालं, त्यावेळी पत्रक वाटण्यात आलं, त्यात पुरोगामी शब्दच गायब करण्यात आला. अनेक खासदारांनी प्रश्न विचारला तेव्हा चुकून प्रिंटिंग मिस्टेक झालं असं ते म्हणाले. धर्मनिरपेक्षता हा शब्द संविधानातून भाजपाला वगळायचा होता. या देशात धर्मद्वेष इतका वाढीला लागलाय, पहिल्या २ टप्प्यात मतदान झाले, त्यानंतर नागपूरला ४ वाजेपर्यंत काही माणसं भेटली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळसूत्राबाबत मोदींनी विधान केले. या देशाची संस्कृती माहिती नसलेला माणूस कसा बोलतो हे ज्वलंत उदाहरण होतं. मणिपूरमध्ये महिलांवर बलात्कार झाले, तेव्हा विचार केला नाही. भाजपाला संविधान आणि संसदीय लोकशाही बदलायची आहे असा आरोप आव्हाडांनी केला.
निष्ठावंतविरुद्ध गद्दार अशी ठाण्याची लढाई
एक चालक हा देश चालवू शकत नाही. आम्ही मेलो तरी रक्ताचे पाट वाहिले तरी या देशाचे संविधान बदलू देणार नाही. ही लढाई संविधानाची आहे. निष्ठावंत विरुद्ध गद्दार अशी ठाण्यात लढाई आहे. माझ्या निष्ठेबाबत टीव्हीवर बघत असाल. मला लढायला आवडतं, समोर अजितदादांसारखा असेल तर अजून लढायला आवडतं असं सांगत ठाण्यातील लढाई निष्ठावंतविरुद्ध गद्दार असल्याचंही आव्हाडांनी सांगितले.