सोपान पांढरीपांडे , नागपूरठाणे महानगरपालिका (टीएमसी) शहर सेवा कंत्राटदार सिटी लाइफलाइन ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला पुढील १० वर्षांत तब्बल २०० कोटींचा अतिरिक्त फायदा मिळणार आहे. ही करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी कशासाठी व हे नुकसान कोण भरून देणार, असे लाखमोलाचे प्रश्न त्यातून उपस्थित झाले आहेत. लोकमतजवळ असलेल्या कागदपत्रांनुसार ठाणे मनपाने २०१५मध्ये जवाहरलाल नेहरू अर्बन रिन्युअल मिशन योजनेअंतर्गत ३० आसनी ५० बस (मिडी) व ५० आसनी १४० बस (स्टँडर्ड) खरेदी केल्या.
या बस ठाणे व मुंबई महानगर प्रदेश शहर बससेवेसाठी वापरायच्या होत्या. त्यासाठी ठाणे मनपाला १० वर्षांसाठी या बस प्रति किलोमीटर दराने चालविणारा खासगी कंत्राटदार हवा होता. यामध्ये कंत्राटदाराला फारशी गुंतवणूक करायची नव्हती तर, फक्त बसची देखभाल दुरुस्ती व चालवण्याचा खर्च करायचा होता. शेजारच्या नवी मुंबई मनपामध्ये अशा कंत्राटासाठी मिडी बसचा दर ३७ रु. प्रति किमी तर स्टँडर्ड बसचा दर ४७ रु. प्रति किमी आहे, अशी माहिती मिळाली. पात्रता निकष बदलले
हा कंत्राटदार शोधण्यासाठी ठाणे मनपाने २०१५ साली निविदा मागविल्या. विशेष म्हणजे पात्रता निकषांमध्ये २०० सीएनजी बस चालविण्याचा पूर्वानुभव व २५ कोटींची मालमत्ता व तेवढीच वार्षिक उलाढाल असावी, असे चमत्कारिक निकष लावण्यात आले. हे दोन्ही निकष फक्त सिटी लाइफलाइनला पात्र ठरविण्यासाठी टाकले गेले.
फक्त दोन कंत्राटदारांच्या निविदा उपलब्ध कागदपत्रानुसार ठाणे मनपाने एकूण तीन वेळा निविदा मागविल्या; परंतु प्रत्येक वेळी फक्त सिटी लाइफलाइन व अँथनी गॅरेजेस प्रा. लि. या दोनच कंपन्यांनी निविदा भरल्या. (गंमत म्हणजे अँथनी गॅरेजेसबद्दल कंपनी व्यवहार मंत्रालयाच्या वेबसाइटवर कुठलीही माहिती उपलब्ध नाही.) अँथनी गॅरेजेसने मिडी बससाठी ५८/ किमी तर स्टँडर्ड बससाठी ७२/ किमी दर भरले होते. सिटी लाइफलाइनने मिडीसाठी ५५.१७/ किमी तर स्टँडर्ड बससाठी ६८.३१/ किमी दर भरले होते. अशाप्रकारे दर कमी असल्याने कंत्राट देण्यासाठी सिटी लाइफलाइनची निवड करण्यात आली. वाटाघाटीदरम्यान सिटी लाइफलाइनने दर आणखी कमी केले. त्यामुळे ठाणे मनपाने २१ नोव्हेंबर २०१५ला ठराव करून सिटी लाइफलाइनला हे कंत्राट मिडीसाठी ५३/ किमी व स्टँडर्ड बससाठी ६६/ किमी या दराने दिले.
२०० कोटींचा अहेरविश्वासनीय सूत्रांनुसार, ठाणे मनपाने मिडी बससाठी ३२/ किमी तर स्टँडर्ड बससाठी ४२/ किमी असा खर्च अनुमानित केला होता. त्यावर कंत्राटदाराचा नफा व देखभाल दुरुस्ती खर्च धरून मिडी बससाठी ४०/ किमी व स्टँडर्ड बससाठी ५२/ किमी या दरात कंत्राट द्यायला हवे होते. परंतु मिडीसाठी ५३/ किमी व स्टँडर्डसाठी ६६/ किमी हे दर मंजूर केल्यामुळे ठाणे मनपा प्रति किलोमीटर किमान १२ रु. सिटी लाइफलाइनला देणार आहे. याप्रमाणे १९० बससाठी ठाणे मनपा दररोज ५.४७ लाख अधिक देणार आहे व १० वर्षांत तब्बल १९६.९९ कोटी म्हणजेच जवळपास २०० कोटींचा अहेर सिटी लाइफलाइनला करणार आहे.
दक्षता आयोग मानकांचे उल्लंघनकेंद्रीय दक्षता आयोगाच्या मानकांनुसार निविदांमध्ये अतिरिक्त दर मंजूर केला असेल तर त्याला अॅब्नॉर्मली हायरेट (एएचआर) समजले जाते व त्याची चौकशी दक्षता आयोगाद्वारे आवश्यक ठरते. सिटी लाइफलाइनच्या प्रकरणात या मानकांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट आहे. या दरम्यान ठाणे मनपाचे आयुक्त संजीव जयस्वाल व सिटी लाइफलाइनचे अनिल शर्मा व भरत मलिक यांना त्यांची बाजू जाणून घेण्यासाठी ई-मेलद्वारे प्रश्नमालिका लोकमतने पाठवली होती. पण तिला प्रतिसाद मिळाला नाही. आयुक्त जयस्वाल या महाघोटाळ्याची चौकशी दक्षता आयोगामार्फत करणार का, हे बघणे रंजक ठरेल!(वृत्तांकन साहाय्य - अजित मांडके, लोकमत, ठाणे)