ठाणे : गेल्या काही दिवसांपासून आजारपणाच्या रजेवर असलेले कासारवडवली पोलीस ठाण्याचे हवालदार भरत ऊर्फसनी दत्तात्रेय रावते (२८) हे शुक्रवारी पहाटेच्या सुमारास गायमुख खाडीत तोल जाऊन पडले. ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेऊन त्यांचा दिवसभर शोध घेतला. नौदलाचीही मदत घेण्यात आली. मात्र, रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध लागला नव्हता.रावते हे शुक्र वारी पहाटे मित्रांसोबत दुचाकीवरून जात होते. गायमुख येथील खाडीजवळ लघुशंकेसाठी गेले असता अंधारात अंदाज न आल्याने तोल जाऊन पाण्यात पडले. त्यांच्यासोबत असलेल्या मित्रांनीच ही माहिती नियंत्रण कक्षाला कळवली. कासारवडवली पोलिसांसह ठाणे महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशामक दलाने शोधमोहीम सुरू केली. मात्र, शुक्रवारी दिवसभर त्यांचा कुठेही शोध लागला नव्हता. ते २००७ मध्ये पोलीस दलात भरती झाले. सुरुवातीला ठाणे आयुक्तालयातील डायघर पोलीस ठाण्यात ते कार्यरत होते. अलीकडेच त्यांची बदली कासारवडवली पोलीस ठाण्यात झाली होती. आजारी असल्यामुळे ते गेल्या महिनाभरापासून रजेवर होते. शुक्र वारी ते कामावर हजर होणार होते. खाडीतील भरतीमुळे ते लांब अंतरावर गेल्याची शक्यता अग्निशमन दलाकडून वर्तवण्यात येत आहे
गायमुख खाडीत पडलेला ठाण्याचा पोलीस हवालदार बेपत्ताच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2016 10:35 PM