लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे पोलिसांनी ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या राज्यभरातील पेट्रोलपंपांविरुद्ध उघडलेल्या मोहिमेमध्ये आणखी आठ पेट्रोलपंपांवर छापे मारले. त्यापैकी चार पेट्रोलपंपांवर हेराफेरी केल्याचे उघडकीस आले.डिस्पेन्सिंग युनिटमध्ये इलेक्ट्रॉनिक चीप लावून ग्राहकांना कमी पेट्रोल देणाऱ्या पेट्रोलपंपांविरुद्ध ठाणे पोलिसांनी कारवाईचा सपाटा लावला आहे. १६ जूनपासून सुरू झालेल्या या कारवाईअंतर्गत बुधवारी आणि गुरुवारी ठाणे आणि नाशिक जिल्ह्यातील आठ पेट्रोलपंपांवर छापा टाकला. टिटवाळा रोडवरील गोवेली येथील प्रथमेश पेट्रोलियम नावाच्या पेट्रोलपंपाची ठाणे पोलिसांनी पाहणी केली. या पंपांवरील डिस्पेन्सिंग युनिटमध्ये हेराफेरी आढळली असून पोलिसांनी पेट्रोल वितरणाचे प्रमाण तपासले असता प्रति पाच लीटरमागे जवळपास २०० ते २२० मिलीलीटर पेट्रोल ग्राहकांना कमी दिले जात असल्याचे स्पष्ट झाले. ठाण्यातील घोडबंदर रोडवरील एचपीसीएलच्या जीजी पेट्रोलपंपाची पोलिसांनी तपासणी करून आक्षेपार्ह साहित्य जप्त केले. शहापूर येथील इंडियन आॅइलच्या शिवसागर पेट्रोलपंपावर पोलिसांनी छापा टाकला असता तेथील डिन्सेन्सिंग युनिटमध्ये हेराफेरी आढळली. येथील पल्सर युनिटमध्ये बोगस सील लावल्याचे निष्पन्न झाले. ग्राहकांना किती प्रमाणात कमी पेट्रोल द्यायचे, हे ठरवण्यासाठी येथे रिमोट कंट्रोलची व्यवस्था करण्यात आली होती. पोलिसांनी ते जप्त केले आहे.नाशिकमधील देवळाली येथील एचपीसीएलच्या श्री दत्त पेट्रोलपंपावरील पेट्रोल वितरण व्यवस्था निर्दोष असल्याचे पोलिसांना आढळले. याच भागातील सह्याद्री पेट्रोलपंपावर मात्र पोलिसांना हेराफेरी आढळली. या पंपावरून पोलिसांनी कंट्रोल पॅनल आणि पल्सर युनिट जप्त केले. शहापूर येथील पार्थसारथी पेट्रोलपंप, कसारा येथील राजदीप ब्रदर्स पेट्रोलपंप आणि कसारा येथील गायत्री पेट्रोलपंपावरील वितरण व्यवस्था पोलिसांना निर्दोष आढळली. हे तिन्ही पेट्रोलपंप इंडियन आॅइल कंपनीचे असल्याची माहिती पोलिसांनी दिली.ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या मोहिमेंतर्गत आतापर्यंत ५८ पेट्रोलपंपांची तपासणी करण्यात आली आहे. जवळपास दोन आठवड्यांत ही कारवाई केली असून त्यासाठी ठाणे पोलिसांची सात पथके राज्यभर कार्यरत आहेत, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
पेट्रोलपंपांवर ठाणे पोलिसांची छापेमारी
By admin | Published: June 30, 2017 1:26 AM