सुरेश लोखंडेठाणे, दि. 10 - पावसाने कहर केलेल्या ठाणे जिल्ह्यात मागील दोन महिन्यांत 10 कुपोषित बालकांसह दोन अर्भकांचा मृत्यू झाला. यापैकी सात बालकांना ऑगस्ट महिन्यात मृत्यूने गाठले. ठाणे जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा मात्र अद्यापही झोपेतच आहे. एप्रिलपासून ऑगस्टपर्यंत 27 बालकांचा मृत्यू झाला आहे. जुलै महिन्यात पाच आणि सात बालके सणासुदीच्या ऑगस्ट महिन्यात दगावली. यात दोन अर्भक आहेत. या मृत्यूंमुळे प्रशासनासह जिल्हा परिषदेला सामाजिक संघटना धारेवर धरण्याच्या तयारीत आहेत.मृत्युमुखी पडलेल्या बालकांमध्ये शहापूर तालुक्यातील तईचीवाडी-लेनाड येथील शेतमजूर रिद्धी वामन पारधी या मातेच्या दीड वर्षाच्या बालिकेचा समावेश आहे. ठिले येथील बेबी निचिते यांची सव्वातीन महिन्यांची बालिका, अंबर्जे या गावातील अंकुश व विनोद या दोन भावांची मुले एका दिवसाआड दगावली. सुमारे दोन महिने कालावधीच्या या मुलांचे अनुक्रमे दोन किलो 500 ग्रॅम व एक किलो 500 ग्रॅम वजन असल्याचे नोंदवण्यात आले. कसा-याजवळील वाशहा खुर्द येथील उषा हौशा मुकणो या मातेची दीड वर्षाची बालिका दोन किलो 700 ग्रॅम वजनाची होती. भागदळ-दहिवली येथील ओमकार वाघ या मजुराचे 19 दिवसांचे बालक दगावले आहे. मुरबाड तालुक्यातील शिरोशीजवळील आळवे येथील बेबी बाबजी हिलम या मातेच्या प्रसूतीदरम्यान बालिकेचा मृत्यू झाला आहे. जुलैत शहापूर तालुक्यातील मढ गावातील दोन बालकांचा दोन दिवसाआड मृत्यू झाला. कासगावमधील तीन वर्षाची बालिका सेप्टीसेमियाने दगावली. याप्रमाणोच जून महिन्यात सहा मुले ठिकठिकाणची दगावली आहेत. सात बालके मे महिन्यात दगावली असून यात तीन बालिका व चार मुलांचा समावेश आहे. याशिवाय एप्रिल महिन्यात चार वर्षाची एक आणि दीड महिन्याची एक अशा दोन बालिकांचा मृत्यू झाला आहे.
ठाण्यात बालमृत्यूचे प्रमाण वाढले, दोन महिन्यात दहा कुपोषित बालकं दगावली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2017 10:33 PM