लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : दरवर्षीप्रमाणे ठाणे महापालिकेतर्फे आयोजित करण्यात येणारी वर्षा मॅरेथॉन यंदा रविवार १३ आॅगस्ट रोजी होणार असल्याची माहिती महापौर मीनाक्षी शिंदे यांनी लोकमतशी बोलताना दिली. मॅरेथॉनसंदर्भातील पहिली बैठक मंगळवारी महापालिकेत पार पडली यात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. मॅरेथॉनची तारीख आणि इतर रुपरेषा ठरविण्यासाठी महापौरांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. प्रत्येक विभागाला कामांचे वाटप करण्यात आले. तसेच, प्रत्येक विभागाकडून चांगली कामे व्हावीत अशी अपेक्षा या बैठकीत व्यक्त करण्यात आली. महापालिकेने मॅरेथॉनसाठी ३० लाखांची तरतूद केली आहे. हा निधी मॅरेथॉनसाठी कमी असून जादा निधीची आवश्यकता आहे. गतवर्षी महापालिकेने २५ लाख निधी दिला होता आणि उर्वरित २३ लाख प्रायोजकत्वाच्या माध्यमातून उभे केले होते. ही स्पर्धा महापालिकेची असल्याने कोणतेही प्रायोजकत्व न घेता सर्व खर्च पालिकेने उचलावा अशी महापौरांची इच्छा आहे. त्यामुळे एकूण किती निधी या मॅरेथॉनसाठी देता येईल हे काही दिवसांत निश्चित होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही मॅरेथॉनमध्ये सेलिब्रेटी आणण्याचा पालिकेचा प्रयत्न असेल. ‘वॉक फॉर फन’ ही दोन किमीची स्पर्धा यंदाही असणार आहे. यंदाही वर्षा मॅरेथॉन ११ गटांत असणार आहे. गतवर्षी २८ अॉगस्ट रोजी ती पार पडली होती.
ठाणे वर्षा मॅरेथॉन १३ आॅगस्ट रोजी
By admin | Published: June 07, 2017 4:03 AM