- प्रज्ञा म्हात्रे ठाणे - महाराष्ट्र राज्याच्या समृद्ध व प्राचीन वारशाची माहिती पुढील पिढीपर्यंत पोचविण्याचा संकल्प करायला हवा, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी आज समस्त ठाणेवासियांना केले.
महाराष्ट्र दिनाच्या ६४ व्या वर्धापनदिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा समारंभ जिल्हाधिकारी शिनगारे यांच्या हस्ते पोलीस क्रीडा संकुल, साकेत मैदान, ठाणे येथे उत्साहात संपन्न झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, पोलीस सहआयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. डी.एस.स्वामी, व इतर अधिकारी-कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. समारंभाच्या सुरुवातीस पोलीस दलाच्या पथकाने राष्ट्रीय ध्वजास मानवंदना दिली तसेच यावेळी राष्ट्रगीत व राज्यगीताची धून वाजविण्यात आली.
सर्वप्रथम शिनगारे यांनी महाराष्ट्र दिनाच्या ६४ व्या वर्धापन दिन समारंभानिमित्त महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी संयुक्त महाराष्ट्र लढ्यात सहभागी झालेल्या आणि आपल्या प्राणाची आहुती दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन केले. ते आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, आजचा दिवस हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. राज्याच्या समृद्ध इतिहासाचे, संस्कृतीचे आणि महाराष्ट्र धर्माचे प्रतिक म्हणून आजच्या या मंगलमय दिवसाकडे पाहता येईल. महाराष्ट्र दिन हा राज्यातील लोकांना एकत्र येण्याचा व त्यातून आपली संस्कृती, समृद्ध वारसा, प्रगतीचा आलेख मांडण्याचा दिवस आहे. कामगार आणि कष्टकऱ्यांच्या श्रमाची दखल घेण्याचा दिवस म्हणून आज आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा होत आहे. या दिनामुळे श्रमाची प्रतिष्ठा अधोरेखित झाली आहे.